पीडीओ-एओ यांच्यावर कारवाई करण्याची मागणी
बेळगाव : बनावट कागदपत्रे तयार करून मालकी जमीन बिल्डरच्या घशात घालण्याचा प्रकार यरगट्टी तालुक्यातील माडनगेरी गावात झाला आहे. ग्रा. पं. पीडीओ व तालुका पंचायतचे एओ यांनी बनावट कागदपत्रे तयार करून 3 कोटी मालकीची 6 गुंठे जमीन विक्री केली आहे. यामुळे राज्य सरकारचा लाखो रुपयांचा महसूल बुडाला असून संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी यरगट्टी येथील लक्ष्मण्णा सवसुद्दी यांनी मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेत केली. यरगट्टी तालुक्याची घोषणा करण्याची मागणी केली जात असल्याने येथील जमिनीला सोन्याचा भाव आला आहे. याचाच फायदा घेत दुर्लक्षित असलेल्या मालकी जमिनी बनावट कागदपत्रे तयार करून बिल्डरच्या घशात घातल्या जात आहेत. माडनगेरी ग्राम पंचायतीचे पीडीओ यल्लव्वा शेरी व यरगट्टी तालुका पंचायतचे एओ यशवंत यांनी बनावट कागदपत्र, बाँड तयार करून याद्वारे 6 गुंठे भूखंडाची एनए लेआऊट करून विक्री करण्याचा प्रकार समोर आला आहे. जिल्ह्याच्या इतर भागातही अधिकाऱ्यांकडूनच मालकी बदलण्यासोबतच सरकारी भूखंड विक्री करण्याचे प्रकार वाढत आहेत. यामुळे लाखो रुपयांचा महसूल बुडत असून राज्य सरकारने संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी लक्ष्मण्णा यांनी केली.









