वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
मुंबईमध्ये झालेल्या चौथ्या खुल्या पुरूषांच्या रॅकेटलॉन स्पर्धेत सिद्धार्थ नंदलने एकेरीचे जेतेपद मिळविताना अंतिम सामन्यात विक्रमादित्य चौफलाचा पराभव केला.
इलाईट अ गटातील एकेरीच्या अंतिम सामन्यात सिद्धार्थने विक्रमादित्यचा 21-23,21-16, 21-9, 7-3 असा पराभव केला. विक्रमादित्य हा भारताचे माजी बॅडमिंटनपटू चौफला यांचा चिरंजीव आहे. विक्रमादित्यच्या वडिलांनी आपल्या बॅडमिंटन कारकिर्दीत विश्व विद्यापीठ बॅडमिंटन चॅम्पियनशिप स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केले होते.
रॅकेटलॉन या क्रीडा प्रकारात टेबल टेनिस, बॅडमिंटन, टेनिस आणि स्क्वॅश या खेळात वापरल्या जाणाऱ्या चार रॅकेट्सचा वापर केला जातो. रॅकेटलॉन या स्पर्धेत 55 वर्षावरील गटात कृष्णा कोटकने जेतेपद मिळविताना सुगातो ठाकुरचा 21-9, 15-21, 11-21, 21-16 असा पराभव केला. 55 वर्षावरील गटात कृष्णा कोटक आणि मेरव्हिन फर्नांडीस यांनी दुहेरीचे जेतेपद मिळविले. 1980 च्या ऑलिम्पिक स्पर्धेत हॉकी क्रीडा प्रकारात सुवर्णपदक मिळविणाऱ्या भारतीय हॉकी संघामध्ये मेरव्हिन फर्नांडीस यांचा समावेश होता. ब विभागात वरुण मोताशाने विजेतेपद मिळविताना आयुष बन्सालीचा 21-14, 21-11, 6-21, 21-4 असा पराभव केला.









