नागरिकांचे आरोग्य धोक्यात : ग्राम पंचायतीचे दुर्लक्ष
बेळगाव : पाईप लाईन रोड, हिंडलगा येथे दूषित पाण्याचा पुरवठा होत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. घरोघरी येणारे पिण्याचे पाणी दूषित येत असल्याने आरोग्याबाबत भीती व्यक्त होत आहे. ग्राम पंचायतीच्या दुर्लक्षपणामुळे हा नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू आहे. अशा संतप्त भावना स्थानिक नागरिकांतून उपस्थित होत आहे. मागील काही दिवसापासून पाईप लाईन रोड येथील रहिवाशांना दुर्गंधीयुक्त दूषित पाण्याचा पुरवठा केला जात आहे. त्यामुळे नागरिकांना पिण्याची पाण्याची इतरत्र ठिकाणाहून व्यवस्था करावी लागत आहे. जलवाहिनी फुटल्याने दूषित पाणी येत आहे का? याची शहानिशा करावी, अशी मागणी होत आहे. यंदा पावसाअभावी पाणी समस्या सर्वत्र गंभीर बनू लागली आहे. त्यातच पिण्याचे पाणी दूषित येत असल्याने नागरिकांतून ग्राम पंचायतीच्या कारभाराबाबत प्रश्न उपस्थित केला जात आहे. शरीराला अपायकारक असलेल्या पाण्याचा पुरवठा होत असल्याने कावीळ, उलट्या, जुलाब यासारख्या आजाराची भीती व्यक्त होत आहे. याबाबत ग्राम पंचायत दखल घेणार का? असा प्रश्न स्थानिकांनी उपस्थितीत केला आहे.आधीच पाणी पुरवठा सुरळीत नाही, निदान पिण्याचे पाणी तरी शुध्द मिळावे, अशी अपेक्षा नागरिकांतून व्यक्त होत आहे. ग्राम पंचायतीने याकडे लक्ष पुरवून शुद्ध पाण्याचा पुरवठा करावा, अशी मागणी महिलांनी केली आहे.









