वृत्तसंस्था/ चंदीगड
शेतकरी नेते आणि केंद्रीय मंत्री यांच्यात रविवारी चौथ्या फेरीतील चर्चा सुरू झाली. या बैठकीमध्ये शेतकरी प्रतिनिधी एमएसपी हमीभावाच्या मागणीवर ठाम असल्याचे दिसून आले. शेतकरी संघटनांच्या विविध मुद्यांवर चर्चा करण्यासाठी रविवारी रात्री उशिरापर्यंत ही बैठक सुरू होती. चर्चेचा संपूर्ण तपशील स्पष्ट झाला नसला तरी शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी आपल्या मागण्या मान्य करण्याचा आग्रह सरकारकडे करत असल्याचे दिसून येत आहे.
हजारो शेतकरी आपल्या मागण्यांसाठी दिल्लीच्या सीमांवर सध्या आंदोलन करत आहेत. या आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी केंद्रीय मंत्री पीयूष गोयल, अर्जुन मुंडा आणि नित्यानंद राय हे सरकारचे प्रतिनिधी शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींशी चर्चा करत आहेत. आतापर्यंत तीन बैठका पूर्ण झाल्या असून रविवारी रात्री चौथ्या फेरीतील चर्चेत विविध मुद्यांवर विचारविमर्ष करण्यात आला. पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान हेदेखील या बैठकीला उपस्थित होते. बैठक सुरू होण्यापूर्वी गुऊदासपूरचे 79 वषीय शेतकरी ज्ञानसिंग यांच्या निधनाबद्दल 2 मिनिटे मौन पाळण्यात आले. शेतकरी आंदोलनादरम्यान हृदयविकाराच्या झटक्मयाने त्यांचे निधन झाले होते.
जगजित सिंग डल्लेवाल आणि सर्वन सिंग पंधेर यांच्यासह शेतकरी नेते केंद्रीय मंत्र्यांसोबत चौथ्या फेरीच्या बैठकीसाठी पूर्वनियोजनानुसार सायंकाळी 6 वाजताच सेक्टर 26 येथील मगसिपा भवनात पोहोचले होते. मात्र तिन्ही केंद्रीय मंत्री उशिराने बैठकस्थळी पोहोचले. या बैठकीदरम्यान संपूर्ण परिसरात सुरक्षा वाढवण्यात आली होती. रविवारी सायंकाळी सहा वाजल्यापासून ही बैठक बोलावण्यात आली होती. मात्र, बैठक सुरू होण्यास दोन तास विलंब झाला. यापूर्वी 8, 12 आणि 15 फेब्रुवारीला चर्चेच्या तीन फेऱ्या झाल्या आहेत. मात्र, शेतकऱ्यांच्या मागण्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार करण्याच्यादृष्टीने त्यात फारसे काही निष्पन्न झाले नाही. मागण्या पूर्ण होत नसल्याने ‘चलो दिल्ली’ची हाक देत घराबाहेर पडलेले विविध राज्यातील शेतकरी बांधव दिल्लीच्या सीमांवर शांततेत आंदोलन करत आहेत. सदर आंदोलकांना दिल्लीत प्रवेश करण्यास मज्जाव करण्यात आला असून सीमेवर कडक बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे.









