वृत्तसंस्था/ भुवनेश्वर
आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनच्या येथे सुरू असलेल्या प्रो-लिग पुरूषांच्या हॉकी स्पर्धेत झालेल्या सामन्यात बलाढ्या ऑस्ट्रेलियाने यजमान भारताचा 6-4 अशा गोलफरकाने पराभव केला. या सामन्यात कर्णधार हरमनप्रित सिंगचे 2 गोल वाया गेले.
या सामन्यात पहिल्या 15 मिनिटांच्या कालावधीत ऑस्ट्रेलियाने वेगवान खेळावर अधिक भर देत भारतावर दडपण आणले होते. पण त्यानंतरच्या कालावधीत भारताने चोख प्रत्युत्तर दिले. कर्णधार हरमनप्रित सिंगने 12 व्या आणि 20 व्या मिनिटाला असे 2 गोल पेनल्टी कॉर्नरवर नोंदविले. सुगजित सिंगने 18 व्या मिनिटाला तर मनदीप सिंगने 29 व्या मिनिटाला गोल केले. ऑस्ट्रेलियातर्फे ब्लेक गोव्हर्सने पहिल्या 2 मिनिटांच्या कालावधीत 2 गोल केले. 40 व्या मिनिटाला अॅरेन झेलिव्हेस्किने, 52 व्या मिनिटाला लेहॅलन शार्पने, 55 व्या मिनिटाला जेकॉन अँडरसनने तर 58 व्या मिनिटाला जॅक वेल्चने गोल केले. या सामन्यात भारताने पेनल्टी कॉनर्सची संधी दवडली. या सामन्यातील शेवटचा 15 मिनिटांच्या कालावधीत ऑस्ट्रेलियाने गाजविला. या कालावधीत ऑस्ट्रेलियाने 3 गोल करुन भारताचे आव्हान संपुष्टात आणले. या सामन्यात ऑस्ट्रेलियाला 3 गुण मिळाले. या स्पर्धेतील भारताचा पुढील सामना आयर्लंड बरोबर होत आहे.









