सीईओ राहुल शिंदे यांची विकास आढावा बैठकीत सूचना : जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा
बेळगाव : राज्यामध्ये बेळगाव जिल्हा आकाराने मोठा आहे. समाज कल्याण खात्याकडून घेण्यात येणाऱ्या स्पर्धात्मक परीक्षा प्रशिक्षण आणि खात्याच्या योजनांसाठी अनुसूचित जाती-जमातीकडून अधिक प्रमाणात अर्ज यावेत, यासाठी जिल्हाभरात योजनांचा प्रचार व्यापक प्रमाणात करावा, अशी सूचना जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे यांनी केली.समाज कल्याण खात्याच्या कार्यालयात गुरुवारी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. समाज कल्याण अनुसूचित जाती कल्याण, मागासवर्गीय कल्याण, अल्पसंख्यांक कल्याण खात्याच्या योजनांचा विकास आढावा घेऊन ते बोलत होते. या चार खात्यांच्या व्याप्तीमध्ये विद्यार्थी वसतीगृह, कामाची समस्या, भूखंड समस्या तसेच पिण्याच्या पाण्याची समस्या या संदर्भातील कोणत्याही समस्या असल्यास आपल्या निदर्शनास आणून देण्यात याव्यात. त्या समस्यांचे निवारण करण्यात येईल. याला अधिकाऱ्यांना जबाबदार धरून कारवाई करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला.
वसती शाळांमधून दहावी पूर्ण करून पदवी घेतलेल्या विद्यार्थ्यांचा शोध घ्या
दहावीची परीक्षा पास होऊन बाहेर पडणाऱ्या विद्यार्थ्यांना सोयीच व्हावे या दृष्टिने वसतीगृहांमध्ये दहावीनंतर असणाऱ्या अभ्यासक्रमांची माहितीचा तक्ता प्रदर्शित करण्यात यावा. रामदुर्ग तालुक्यातील बटकुर्की इंदिरा वसती शाळेमध्ये पिण्याच्या पाण्याची समस्या आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी समस्या निवारण करण्यासाठी त्वरित कार्यवाही करावी, अशी सूचना त्यांनी केली. गेल्या पाच वर्षांमध्ये वसती शाळांमधून दहावी पूर्ण करून पदवी शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांचा शोध घेण्यात यावा. ते सध्या काय करीत आहेत, त्यांची परिस्थिती काय आहे, याबाबतची माहिती घेण्यासाठी पथकाची नियुक्ती करण्यात यावी. मार्च 31 पर्यंत या संदर्भातील अहवाल देण्यात यावा, असे त्यांनी सांगितले. यावेळी संतसेवालाल जयंतीच्या पार्श्वभूमीवर सीईओ राहुल शिंदे यांच्याकडून फोटो पूजन करण्यात आले. यावेळी समाज कल्याण खात्याचे साहाय्यक संचालक लक्ष्मण बबली, जिल्हा अनुसूचित वर्ग कल्याण अधिकारी बसवराज कुरीहुली, मागासवर्गीय कल्याण अधिकारी शिवप्रिया कडेचूर यांच्यासह इतर खात्याचे अधिकारी उपस्थित होते.









