रुग्णालय स्वच्छ ठेवण्यासाठी अधिकाऱ्यांना सूचना : साधनसामग्री उपलब्ध करून देण्याचे आश्वासन
बेळगाव : चचडी (ता. सौंदत्ती) येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देऊन वैद्यकीय सुविधांची व कर्मचाऱ्यांच्या हजेरींचे पाहणी जि. पं. मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे यांनी केली. रुग्णालय स्वच्छ ठेवण्यासाठी अधिकाऱ्यांना सूचना करून रुग्णालयात आवश्यक साधनसामग्री देण्याचे आश्वासन दिले. चचडी गावाला भेट दिल्यानंतर ग्राम पंचायत व डिजिटल लायब्ररीची पाहणी त्यांनी केली. प्रामुख्याने तेथील प्राथमिक आरोग्य केंद्राला रुग्ण सेवेसंदर्भातील माहिती जाणून घेतली. आरोग्य केंद्र परिसरात वैद्याधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना वसतीगृहाची आवश्यकता असून त्याच्या पूर्ततेची मागणी ग्रामस्थांकडून केली. यामुळे नागरिकांना वैद्यकीय सुविधा मिळण्यास सोयीचे ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले. याबाबत योग्य तो निर्णय घेण्यात येईल, असे राहुल शिंदे यांनी आश्वासन दिले.
शुद्ध पाणीपुरवठा घटकाची पाहणी
ग्राम पंचायत आवारामध्ये असणाऱ्या शुद्ध पाणीपुरवठा घटकाची पाहणी केली. त्यामध्ये नाणे टाकून पाणी मिळते की नाही याची तपासणी करण्यात आली. डिजिटल ग्रंथालयाला भेट देऊन कर्मचाऱ्यांच्या हजेरीची पाहणी केली. ग्रंथालयातील पुस्तके यांचा विद्यार्थ्यांना कितपत उपयोग होत आहे. याबाबत माहिती जाणून घेतली. ग्राम पंचायतीला भेट देऊन अधिकाऱ्यांकडून विकासकामांसह रोजगार हमी योजनेतील कामांची पाहणी केली. नागरिकांची कामे वेळेत पूर्ण करून द्यावीत, वारंवार फेऱ्या मारायला लावू नये, तक्रार आल्यास कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला. यावेळी तालुका पंचायत कार्यकारी अधिकारी यशवंतकुमार, साहाय्यक संचालक रामाप्पा रक्कसगी, योजना अधिकारी डॉ. मारुती चौडक्कन्नावर आदी उपस्थित होते.









