खानापूर तालुका वकील संघटनेतर्फे तहसीलदारांना निवेदन, वकिलांवरील हल्ल्याचा निषेध
वार्ताहर /नंदगड
संकेश्वर येथील सागर माने यांच्यावर गुंडाकरवी हल्ला केला होता. त्याचप्रमाणे रामनगर, बेंगळूर येथील सुमारे 40 वकिलांवर खोटी केस नोंदवून एक वेगळा बेकायदेशीररित्या गुन्हा नोंद करण्यात आला आहे. त्यामुळे पुन्हा अशा केसेस होऊ नये म्हणून तहसीलदारांनी अशी प्रकरणे वेळेत निकालात काढावीत अशी मागणी करण्याबाबतचे निवेदन खानापूर तालुका वकील संघटनेतर्फे तहसीलदार प्रकाश गायकवाड यांना दिले. गेल्या अधिवेशनामध्ये कर्नाटकाचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी विधानसभेमध्ये वकील संरक्षण कायदा मंजूर केलेला आहे. तरी सुद्धा याला न जुमानता आज-काल वकिलांवर मोठ्या प्रमाणात खोटे आरोप करणे. त्यांच्यावर पोलीस स्टेशनमध्ये खोट्या केसेस नोंदविल्या जात आहेत. शिवाय तक्रारदाराला प्रत्यक्षात पोलीसही प्रोत्साहन देत आहेत. ही निंदनीय बाब आहे. वकील हा पक्षकांरासाठी व त्याच्या समस्या सोडवून त्याना न्याय देण्यासाठीच प्रयत्न करत असतो. याबद्दल आज विचार करण्याची वेळ आलेली आहे. कारण पक्षकार सुद्धा वकिलांकडे वेळेचं बंधन घालून एकदा का वकिलाना फी दिल्यानंतर एक सारखे वेळोवेळी रात्री अपरात्री फोनमार्फत पाठपुरावा करण्यासाठी प्रयत्न करत असतात. वकिलांकडून प्रकरणे लवकरात लवकर निकाली काढणे हा त्यांचा हक्क असतो. परंतु भारतीय घटनेप्रमाणे संविधान शिल्पी बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या घटनेप्रमाणे वादी-प्रतिवादी यांच्यामधील कागदपत्रे पडताळूनच कोर्टामध्ये न्याय दिला जातो. वाढत्या केसेस न्यायालयाच्या चिंतेचा विषय बनला आहे. यासाठी पक्षकांरानी व नागरिकांनी आपल्या मनाप्रमाणे वकिलांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये.
…तर आंदोलन करण्याचा इशारा
त्याचप्रमाणे तहसीलदार, प्रांताधिकारी, जिल्हाधिकारी, नोंदणी अधिकारी यांच्या कार्यालयामध्ये कोर्टाने आदेश दिल्यानंतर वेळेचे पालन होत नाही. आलेल्या अर्जाची तात्काळ विल्हेवाट लावून पक्षकाराना कागद पत्राबद्दल कमतरता किंवा त्यामधील त्रुटी सांगून त्यांना योग्य माहिती देऊन तसे लेखी कारणसुद्धा त्याने दिले पाहिजे. महसूल विभागाच्या दिरंगाईमुळे विनाकारण वकिलांना आरोप प्रत्यारोपांना सामोरे जावे लागत आहे. यासाठी गुरुवारी खानापूर तालुका वकील संघटनेने अध्यक्ष ईश्वर घाडी यांच्या अध्यक्षतेखाली एक निवेदन घेऊन याबाबतचा जाब तहसीलदाराना विचारण्यात आला. तहसीलदार कार्यालयामध्ये या संदर्भातील जी प्रकरणे पडून आहेत. ती तात्काळ निकालात काढावीत. अन्यथा जनतेला सुद्धा सोबत घेऊन उग्र आंदोलन करून आवाज उठवणार असल्याचा इशारा खानापूर वकील संघटनेचे अध्यक्ष ईश्वर घाडी यांनी तहसीलदाराना दिला.
प्रलंबित प्रकरणे निकालात काढणार
यावेळी ज्येष्ठ वकील एच. एन. देसाई, चेतन मणेरीकर, ए. डी. लोकरे, एम. ए. पाटील, अनंत देसाई, अरुण सरदेसाई, आर. एन. पाटील, एम. वाय. कदम, मारुती हेरेकर, सुरेश भोसले, एस. एन. लोटूलकर, केशव कळ्ळेकर, आर. एन. पाटील, इत्यादी उपस्थित होते. तहसीलदार प्रकाश गायकवाड यांनी निवेदनाचा स्वीकार करून प्रलंबित प्रकरणे तात्काळ निकालात काढण्यात येतील असे आश्वासन दिले. वकिलांवर झालेल्या हल्ल्याचा निषेध संकेश्वर येथील वकील सागर माने यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा खानापूर तालुका वकील संघटनेतर्फे केला.









