वृत्तसंस्था /जमशेदपूर
डावखुरा फलंदाज सौरभ तिवारीने व्यवसायिक क्रिकेट क्षेत्रातून आपल्या निवृत्तीची घोषणा केली आहे. 2024 च्या रणजी हंगामातील झारखंड आणि राजस्थान यांच्यातील सामन्याला शुक्रवार 16 फेब्रुवारीपासून प्रारंभ होणार आहे. सौरभ तिवारीचा हा शेवटचा सामना राहिल. आपल्या 17 वर्षांच्या क्रिकेट कारकीर्दित सौरभ तिवारीने झारखंडचे प्रतिनिधित्व केले असून त्याने 3 वनडे सामन्यात भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. क्रिकेटमधील सर्व प्रकारातून आपण निवृत्त होत असल्याचे 34 वर्षीय तिवारीने पत्रकारांशी बोलताना सांगितले. 2010 साली भारताकडून 3 वनडे सामन्यात खेळताना 49 धावा जमविल्या होत्या. त्याने 115 प्रथम श्रेणी सामन्यात 8030 धावा जमविल्या असून त्यामध्ये 22 शतके आणि 34 अर्धशतकांचा समावेश आहे. 2006-07 साली सौरभ तिवारीने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये आपले पदार्पण रणजी स्पर्धेत केले होते. 2008 साली आयसीसीची 19 वर्षाखालील वयोगटातील विश्वचषक क्रिकेट स्पर्धा जिंकणाऱ्या कर्णधार विराट कोहलीच्या भारतीय संघामध्ये सौरभ तिवारीचा समावेश होता. 2021 साली त्याने आयपीएल आयपीएल स्पर्धेतील आपला शेवटचा सामना मुंबई इंडियन्सकडून खेळला होता.









