जागतिक कुस्ती संघटनेचा महत्वपूर्ण निर्णय : कुस्तीपटूंचा एकच जल्लोष
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
जागतिक कुस्ती महासंघाने मोठा निर्णय घेत भारतीय कुस्ती महासंघाचे निलंबन हटवले आहे. यामुळे भारतीय कुस्ती महासंघाला सदस्यत्व पुन्हा मिळाले असून देशातील कुस्तीपटूंना आता राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होता येणार आहे. गतवर्षी ऑगस्टमध्ये भारतीय कुस्ती महासंघाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीनंतर बराच वाद निर्माण झाला होता. पण जागतिक कुस्ती महासंघाने मंगळवारी काही अटी घालत निलंबन मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. यानंतर नंवी दिल्लीत कुस्तीपटूंनी एकच जल्लोष केला.
भारतीय कुस्ती महासंघाने वेळेत निवडणूका न घेतल्यामुळे त्यांच्यावर निलंबन घालण्याचा निर्णय घेतला होता. अर्थात, ऑलिम्पिकसह अन्य महत्वाच्या स्पर्धा जवळ आल्याने जागतिक कुस्ती संघटनेने भारतीय कुस्ती महासंघाच्या सर्व गोष्टींचा आढावा घेतला आणि त्यासाठी एक बैठक घेतली आणि सर्व घटक आणि माहिती लक्षात घेऊन निलंबन मागे घेण्याचा निर्णय घेतला. यानंतर जागतिक कुस्ती महासंघटनेने निवदेन जारी करताना म्हटले आहे की, भारतीय कुस्ती महासंघाने विनेश फोगट, बजरंग पूनिया आणि साक्षी मलिक यांच्यावर भारतीय कुस्ती संघटना कोणतीही कारवाई करणार नाही. याबाबत भारतीय कुस्ती महासंघाने जर लेखी हमी दिली तर निलंबन मागे घेण्यात येणार आहे. भारतासाठी हा निर्णय सर्वात महत्वाचा मानला जात आहे. यामुळे देशाच्या तिरंग्याखाली खेळाडूंना खेळता येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
याशिवाय, लवकरात लवकर नव्याने निवडणूका घेण्याचे निर्देश जागतिक कुस्ती महासंघाने भारतीय संघटनेला दिले आहेत. यासाठी देखील काही नव्या सूचना जागतिक महासंघाने भारतीय संघाला दिल्या आहेत. या सूचनांचे तंतोतत पालन करण्यात यावे असे निर्देशही त्यांनी दिले आहेत. तसेच सर्व कुस्तीपटूंना सर्व ऑलिम्पिक खेळ आणि इतर कोणत्याही प्रमुख राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये कोणताही भेदभाव न करता भाग घेण्याची परवानगी दिली जाईल.









