काकती ग्रामपंचायतीकडे मागणी
काकती : माजी सैनिक संघटना काकती यांच्यावतीने घरपट्टी कर फाळ्यात 50 टक्के सूट देऊन अंमलबजावणी करण्यात यावी, अशी मागणी ग्रामपंचायतीकडे कर्नाटक सरकारच्या राज्यपत्रातील आदेशाची पत्र देऊन करण्यात आली. कर्नाटक मुद्रांक कायदा, 1957, उपकलम 199 कर्नाटक राज्यपत्रातील 28-12-2021 चा आदेश कॉलम इ) नुसार सैनिक, माजी सैनिकांच्या विधवा पत्नी यांच्या स्वत:च्या निवासस्थान, घर/इमारतीना 50 टक्के करातून सूट देण्याचा आदेश देण्यात आला आहे, असे माजी सैनिक संघटनेच्या शिष्टमंडळाने ग्रामपंचायतीच्या निदर्शनास आणून दिले. राज्यपत्र सुपूर्द करताना संघटनेचे अध्यक्ष सुभेदार लक्ष्मण माहुत, उपाध्यक्ष सुभेदार भावकाण्णा होसूरकर, माजी अध्यक्ष सुभेदार कृष्णा निलजकर, सुभेदार मारुती हाल्लण्णवर, सुभेदार मल्लाप्पा सनदी, सुभेदार, सिद्राई गवी हजर होते. ग्रामपंचायत अध्यक्षा वर्षा मुचंडीकर, ग्रामविकास अधिकारी अरुण नाथबुवा यांनी राज्यपत्राचा स्वीकार करून मागणीची पूर्तता करण्याचे आश्वासन दिले.









