‘संगीत संशयकल्लोळ’ नाटकात नर्म विनोदांनी भरले मिष्कील रंग
बेळगाव : मराठी संगीत नाट्यापरंपरेत ‘संगीत संशय कल्लोळ’ या नाटकाने मिश्किल रंग भरले. यातील नर्म विनोद आजही रसिकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवितात. रविवारी कन्नड भवन येथे झालेल्या या प्रयोगाने असेच हास्य फुलविले आणि त्यातील गायकांनी सादर केलेल्या गीतांना टाळ्यांची सातत्याने दाद मिळाली. वेणुग्राम अकॅडमी ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स या संस्थेतर्फे गंधर्वभूषण जयराम शिलेदार संगीत नाट्या सेवा ट्रस्ट, पुणेतर्फे प्रस्तुत शनिवार आणि रविवारी दोन नाट्याप्रयोग झाले. शनिवारी ‘संगीत सौभद्र’चा तर रविवारी ‘संशय कल्लोळ’चा प्रयोग झाला. याचे थोडक्यात कथानक म्हणजे आश्विन शेठ आणि रेवती हे परस्परांवर लुब्ध आहेत. आश्विन शेठच्या ऐन तारुण्यात एका मागोमाग एक तिन्ही पत्नी निधन पावतात. त्यामुळे एखाद्या नायकिणीच्या मुलीशी त्याने विवाह करावा, असे ज्योतिषी सांगतात. फाल्गुनराव आणि त्याची पत्नी कृतिका हे जोडपे सतत परस्परांवर संशय घेत असते.
आश्विनला भेटून त्याचा फोटो घेऊन परतताना रेवती उन्हामुळे खाली कोसळते. त्याचवेळी फाल्गुनराव तिला सावरतात. हे दृष्य पाहून कृतिका संशय घेते आणि ही संशयाची गुंतागुंत वाढत जाऊन नाटकाअखेर त्या सगळ्याचा खुलासा होतो. या नाट्याप्रयोगामध्ये कलाकारांच्या अभिनयात जी सहजता होती तितकीच त्यांच्या गायनातही होती. एकाहून एक अर्थपूर्ण अशी पदे कलाकारांनी सादर करत सातत्याने प्रेक्षकांची दाद मिळविली. विस्मरणात गेलेल्या अनेक गीतांना या दोन्ही प्रयोगांनी उजाळा दिला. गायनावरील त्यांची हुकूमत कौतुकास्पद. विशेष म्हणजे सर्व पात्रांची वेशभूषा आणि रंगभूषा लक्षवेधी, त्यांच्या गायनाला वादकांचीही तितकीच नेटकी व तालबद्ध अशी साथ लाभली. त्यामुळे या दोन्ही प्रयोगांनी एक उत्तम नाट्याप्रयोग पाहिल्याचे समाधान प्रेक्षकांना नक्कीच दिले.









