निपाणी विजयी, टीएफएला दर्शनने रोखले
बेळगाव : कर्नाटक राज्य फुटबॉल संघटना मान्यताप्राप्त बेळगाव जिल्हा फुटबॉल संघटना आयोजित लोकमान्य को-ऑप. सोसायटी पुरस्कृत लोकमान्य चषक बीडीएफए वरिष्ठ साखळी फुटबॉल स्पर्धेच्या उद्घाटन दिवशी निपाणी एफसीने चौगुले एफसीचा 3-1 असा पराभव केला तर टीएफएला दर्शन युनायटेडने 1-1 असा बरोबरीत रोखले. लव्हडेल स्कूलच्या स्पोर्टिंग प्लॅनेट मैदानावर स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे लोकमान्य सोसायटीचे संचालक अजित गरगट्टी, सुबोध गावडे, गजानन धामणेकर, बेळगाव जिल्हा फुटबॉल संघटनेचे अध्यक्ष पंढरी परब, उपाध्यक्ष लेस्टर डिसोजा, अमित पाटील, एस.एस. नरगोडी, राम हदगल, अल्लाबक्ष बेपारी, प्रशांत देवदानम आदी मान्यवरांच्या हस्ते चेंडू लाथाडून व खेळाडूंची ओळख करून स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. प्रारंभी बेळगाव जिल्हा फुटबॉल संघटनेचे माजी उपाध्यक्ष व लोकमान्य सोसायटीचे समन्वयक विनायक जाधव यांच्या निधनाबद्दल श्रद्धांजली वाहण्यात आली त्यानंतर सामन्याला सुरुवात करण्यात आली.
टीएफए व दर्शन युनायटेड यांच्यात पहिला सामना झाला. या सामन्यात 15 व्या मिनिटाला टीएफएला पेनल्टी मिळाली त्याचा फायदा उठवत समर्थ बांदेकरने गोल करून 1-0 ची आघाडी टीएफएला मिळवून दिली. दुसऱ्या सत्रात 44 व्या मिनिटाला दर्शन युनायटेडच्या धनंजय सुळगेकरच्या पासवर रिगन डिलीमाने गोल करून 1-1 अशी बरोबरी केली. त्यानंतर दोन्ही संघांनी गोल करण्यासाठी अनेक प्रयत्न केले पण त्यांना अपयश आले. दुसऱ्या सामन्यात निपाणी युनायटेडने चौगुले एफसीचा 3-1 असा पराभव केला. या सामन्यात 14 व्या मिनिटाला निपाणीच्या करण मानेच्या पासवर ओमकार शिंदेने पहिला गोल करून 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. 22 व्या मिनिटाला निपाणीच्या विनायक दिवटेच्या पासवर ओमकार शिंदेने दुसरा गोल करून 2-0 अशी आघाडी पहिल्या सत्रात मिळवून दिली. दुसऱ्या सत्रात 41 व्या मिनिटाला चौगुलेच्या रजतने गोल करून 1-2 अशी आघाडी कमी केली. पण खेळाच्या 49 व्या मिनिटाला ओमकार शिंदेच्या पासवर शादाब खानने गोल करून 3-1 असा विजय मिळवून दिला.
बुधवारचे सामने : 1) कॉसमॅक्स एफसी वि. गोवन्स एफसी दुपारी 3.30, 2) युनायटेड गोवन्स वि. वायएमसीए सायंकाळी 5 वा.









