सुष्मिता देव यांना दुसऱ्यांदा संधी : पत्रकार सागरिका घोष यांच्या नावाचाही समावेश
वृत्तसंस्था/ कोलकाता
राज्यसभेवर पाठवण्यासाठी तृणमूल काँग्रेसने रविवारी चार उमेदवारांची घोषणा केली आहे. टीएमसीने रविवारी ज्येष्ठ पत्रकार सागरिका घोष, पक्षाच्या नेत्या सुष्मिता देव, नदीमुल हक आणि ममता बाला ठाकूर यांच्या नावांची घोषणा केली. ‘येत्या राज्यसभा निवडणुकीसाठी सागरिका घोष, सुष्मिता देव, मोहम्मद नदीमुल हक आणि ममता बाला ठाकूर यांच्या उमेदवारीची घोषणा करताना आम्हाला आनंद होत आहे’ असे ट्विट तृणमूल काँग्रेसने ‘एक्स’वर केले आहे.
पश्चिम बंगालमध्ये राज्यसभेच्या पाच जागांवर निवडणूक होणार आहे. या पाचपैकी एका जागेवर भाजपचा विजय निश्चित आहे. उर्वरित चार जागा टीएमसी जिंकू शकतात. त्यामुळेच टीएमसीने केवळ चार नावांची घोषणा केली आहे. टीएमसीने पुन्हा एकदा सुष्मिता देव यांना राज्यसभेवर पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. नदीमुल हक यांनाही पुन्हा राज्यसभेवर पाठवले जाणार आहे. मात्र, पत्रकार सागरिका घोष यांना प्रथमच राज्यसभेवर जाण्याची संधी देण्यात आली आहे.
तृणमूल काँग्रेसचे अबीर बिस्वास, सुभाशिष चक्रवर्ती, नदीमुल हक, शंतनू सेन आणि काँग्रेसचे अभिषेक मनु सिंघवी यांचा कार्यकाळ 2 एप्रिल रोजी संपत आहे. राज्यसभेच्या जागांसाठी 27 फेब्रुवारीला मतदान होणार आहे. तृणमूल काँग्रेसच्या आमदारांची संख्या 216 आहे. या जोरावर टीएमसीचा चार जागांवर विजय निश्चित मानला जात आहे. भाजपचे 67 आमदार असून भाजपही एक जागा जिंकू शकतो.









