आठच दिवस शिल्लक असल्याने मुदतवाढीची मागणी : 17 फेब्रुवारी शेवटची तारीख
बेळगाव : जुन्या वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट (एचएसआरपी) बसविण्यासाठी अवघा आठवडाभराचा कालावधी शिल्लक राहिला आहे. एकीकडे नोंदणी करणाऱ्यांची संख्या वाढत असतानाच सर्व्हर डाऊनमुळे एचएसआरपीसाठी नोंदणी करताना समस्या येत आहेत. त्यामुळे एचएसआरपीसाठीची मुदत वाढविण्याची मागणी वाहनचालकांमधून होत आहे. कर्नाटक परिवहन विभागाच्यावतीने एचएसआरपी नंबरप्लेट सक्तीची करण्यात आली आहे. एप्रिल 2019 पूर्वी रजिस्ट्रेशन केलेल्या वाहनांना नवीन नंबरप्लेट बसवावी लागणार आहे. या नंबरप्लेटवर आधार क्रमांकाच्या धर्तीवर युनिक नंबर देण्यात आला आहे. या क्रमांकामुळे वाहन व वाहनचालकाची संपूर्ण माहिती परिवहन विभागाला तात्काळ कळणार आहे. नवीन नंबरप्लेटसाठी 17 फेब्रुवारी ही शेवटची तारीख असून त्यानंतर एचएसआरपी नंबरप्लेट नसलेल्या वाहनचालकांना हजार रुपयांचा दंड ठोठावला जाणार आहे. केवळ आठवडाभराचा कालावधी शिल्लक राहिल्याने नोंदणी करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. बेळगाव विभागात लाखो जुनी वाहने असून यामध्ये दुचाकी, चारचाकी, व्यावसायिक वाहने, शेती वाहने यांचा समावेश आहे. या सर्व वाहनांना नव्या नंबरप्लेट बसवून घेणे सक्तीचे करण्यात आले आहे. नागरिकांची फसवणूक टाळण्यासाठी परिवहन विभागाने दिलेल्याच अधिकृत डिलरकडे नंबरप्लेट मिळणार असून तेथेच ती बसून घ्यायची आहे.
नंबरप्लेटसाठी दोन महिन्यांची प्रतीक्षा
बेळगाव विभागात वाहनांची संख्या मोठी असतानाही डिलर्सची संख्या मर्यादित आहे. यामुळे नंबरप्लेटसाठी नोंदणी केल्यानंतर दोन महिन्यांनंतर स्लॉट दिला जात आहे. एचएसआरपीसाठी आठवडाभराचा कालावधी असताना दोन महिन्यांनंतर नंबरप्लेट बदलली तर कारवाई होणार नाही का? असा प्रश्न वाहनचालकांसमोर आहे. किमान 17 फेब्रुवारीपूर्वी नोंदणी केलेली पावती वाहनचालकांकडे असणे आवश्यक असल्याचे परिवहन विभागाने स्पष्ट केले आहे.
सर्व्हर डाऊनमुळे मनस्ताप
एचएसआरपीसाठी नोंदणी केल्यानंतर वाहनाच्या प्रकारानुसार ऑनलाईन शुल्क भरावे लागते. परंतु, बऱ्याच वेळा सर्व्हर डाऊनमुळे शुल्क भरले असतानाही शेवटची प्रक्रिया होत नसल्यामुळे वाहनचालकांना आरटीओ कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागत आहेत. त्यामुळे एचएसआरपीसाठी सुरळीत सर्व्हर देण्याची मागणी वाहनचालकांतून होत आहे.









