कसबा बीड- वार्ताहर
कोगे (ता.करवीर) येथील ओंकार भगवान साठे – पाटील या मुलाने उच्च शिक्षणासाठी देण्यात येणारी केंद्र शासनाची ‘विद्यांजली स्कॉलरशिप’ मिळविली आहे. ही स्कॉलरशिप महाराष्ट्रातील फक्त दोन मुलांना मिळाली आहे. एका गरीब सेंट्रींग कामगाराच्या मुलाने जिद्द व चिकाटी च्या जोरावर मिळवलेले हे यश कोगे गावाच्या इतिहासात पहिल्यांदाच लहान वयात दिल्ली पर्यंत उल्लेखनीय कामगिरी करणारा विद्यार्थी आहे. त्याचे कोगे परिसरात कौतुक होत आहे.
ओंकार चे प्राथमिक शिक्षण गावातील कुमार विद्या मंदिर शाळेत झाले. फक्त पाच गुंठे जमीन असणाऱ्या भगवान साठे – पाटील यांना तीन मुली व एक मुलगा असा परिवार आहे. शेती कमी असल्याने सेंट्रींग कामासह मिळेल ते काम करून त्यांनी मुलांना शिक्षण दिले. सर्वात लहान व एकुलता एक मुलगा ओंकार लहानपणापासूनच हुशार आहे. ओंकारला परिस्थितीची जाणीव असल्याने व वडिलांचे कष्ट जवळून पाहिल्याने यातून शिक्षणच आपल्याला सोडवून शकते हा ध्यास घेऊन ओंकारने अभ्यासातील सातत्य कधीच कमी केले नाही.
पुढे त्याची निवड नवोदय विद्यालय कागल येथे झाली. अकरावी बारावी चे शिक्षण बुंदी (राजस्थान) येथे झाले. जेईई परीक्षेतील गुणवत्तेवर त्याची निवड आय आय टी मुंबई येथे झाली आहे. त्याच्या शिक्षणाचा चढता आलेख व चिद्द व चिकाटी पाहून कागल येथील नवोदय विद्यालयाने त्याच्या नावाची शिफारस ‘विद्यांजली शिष्यवृत्ती’ साठी केंद्र शासनाकडे केली होती.विद्यांजली शिष्यवृत्ती ही उच्च शिक्षणासाठी आर्थिक गैरसोय असलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांना केंद्र शासन देते. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या हस्ते नवी दिल्ली येथील कार्यक्रमात मंगळवार 6 फेबुवारी रोजी देण्यात आले आहे. त्यांच्या यशाने कोगे गावातील शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.