कार्यकर्ते-पोलिसांत झटापट : काँग्रेसकडून रास्तारोको आंदोलन
बेळगाव : केंद्र सरकारकडून अर्थसंकल्प जाहीर केल्यानंतर काँग्रेस नेते डी. के. सुरेश यांनी केंद्र सरकारविरोधात टिप्पणी केली होती. स्वतंत्र दक्षिण भारत राष्ट्राच्या मागणीचा इशारा दिला होता. त्यामुळे भाजप कार्यकर्त्यांकडून बुधवारी काँग्रेस कार्यालयावर मोर्चा काढून डी. के. सुरेश यांचा निषेध नोंदविण्यात आला. यावेळी काही कार्यकर्त्यांनी काँग्रेस कार्यालयात घुसून धुडगूस घालण्याचा प्रयत्न केला. यामुळे पोलीस व कार्यकर्त्यांमध्ये झटापट झाली. जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन परत जाणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांनी आरटीओ सर्कल येथील काँग्रेस कार्यालयाकडे मोर्चा वळवून कार्यालयासमोर आंदोलन केले. काँग्रेस कार्यालयाच्या आवारात घुसल्याने पोलिसांची तारांबळ उडाली. त्यामुळे कार्यकर्ते व पोलिसांमध्ये झटापट झाली. कार्यालयात धुडगूस घालण्याचा प्रयत्न करणाऱ्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. लागलीच येथे दाखल झालेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये व भाजप कार्यकर्त्यांमध्ये वादावादी झाली. यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी आरटीओ सर्कलमध्ये रास्तारोको करून संबंधितांना अटक करून गुन्हे दाखल करण्यात यावेत, अशी मागणी करत आंदोलन केले. भाजप कार्यकर्त्यांच्या या कृत्याचा तीव्र निषेध करण्यात आला. त्यामुळे काहीकाळ परिसरात तणाव निर्माण झाला होता. काँग्रेस कार्यालयासमोर मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.









