पीयूसी प्रथम वर्ष परीक्षा 13 पासून : दहावीची पूर्वतयारी परीक्षा 26 पासून
बेळगाव : दहावी, बारावी यासह सर्वच परीक्षा आता जवळ आल्याने विद्यार्थी परीक्षेच्या तयारीसाठी लागले आहेत. दि. 13 ते 28 फेब्रुवारीदरम्यान पीयूसी प्रथम वर्षाची परीक्षा होणार आहे. यापाठोपाठ पीयूसी द्वितीय वर्षाची मुख्य परीक्षा, त्याचबरोबर दहावीची पूर्वतयारी परीक्षा होणार असल्याने विद्यार्थी रात्रंदिवस अभ्यासाला लागले आहेत. पीयूसी द्वितीय वर्षाची पूर्वतयारी परीक्षा दि. 16 ते 29 जानेवारीदरम्यान पार पडली. यानंतर आता प्रथम वर्षाची अंतिम परीक्षा होणार आहे. यासाठी महाविद्यालयांमधून तयारी सुरू करण्यात आली आहे. दि. 13 ते 28 फेब्रुवारीदरम्यान प्रथम वर्षाची परीक्षा घेतली जाणार आहे. त्यामुळे मागील काही वर्षांच्या प्रश्नपत्रिका सोडविण्याचा सराव करणे, मॉडेल प्रश्नपत्रिका सोडविणे यामध्ये विद्यार्थ्यांनी स्वत:ला झोकून दिले आहे. सोमवार दि. 26 फेब्रुवारीपासून दहावीची पूर्वतयारी परीक्षा घेतली जाणार आहे. मुख्य परीक्षेचा सराव व्हावा, तसेच विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिकेचे स्वरुप समजावे, यासाठी पूर्वतयारी परीक्षा घेतली जाणार आहे. सध्या प्रात्यक्षिक परीक्षा शाळांमध्ये सुरू करण्यात आल्या आहेत. पूर्वतयारी परीक्षांसाठी प्रत्येक विद्यार्थ्याकडून 50 रुपये शुल्क आकारण्यात आले आहे. यानंतर मार्च महिन्यात इतर वर्गांच्या परीक्षा घेतल्या जाणार आहेत.
पदवीपूर्व शिक्षण विभागाकडून तयारी सुरू
पीयूसी प्रथम वर्ष व द्वितीय वर्षाच्या परीक्षा सुरू होणार असल्याने पदवीपूर्व शिक्षण विभागाकडून तयारी सुरू आहे. प्रत्येक परीक्षा केंद्रावर सीसीटीव्ही तसेच पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात येत आहे. परीक्षांबाबत महाविद्यालयांना सूचना करण्यात आल्या असून विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिका सोडविताना कोणत्याही अडचणी येणार नाहीत.
-एम. एम. कांबळे, जिल्हा पदवीपूर्व शिक्षणाधिकारी









