लोकसभेचे तिकीट देऊ नये : केपीसीसी महिला सदस्यांची मागणी
बेळगाव : जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी उत्तर कर्नाटकातील प्रभावी नेते आहेत. त्यांच्या दूरदृष्टीमुळे या भागाच्या विकासाला चालना मिळाली आहे. त्यामुळे जारकीहोळी हे राज्याच्या राजकारणामध्येच रहावेत, त्यांना लोकसभेचे तिकीट देवू नये, अशी मागणी केपीसीसी सदस्य आएशा सनदी यांनी पत्रकार परिषदेत केली. त्या म्हणाल्या, सतीश जारकीहोळी हे मंत्रीपदावर आहेत. राज्यामध्ये काँग्रेस सरकार सत्तेवर आणण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. त्यांच्या दूरदृष्टीमुळेच जिल्ह्यासह राज्यामध्ये अनेक विकास कामे राबविली झाली. त्यामुळे राज्याच्या राजकारणात ते सक्रिय राहणे गरजेचे आहे. बेळगाव लोकसभा मतदार संघातून मंत्री जारकीहोळी यांना तिकीट देणार असल्याचे समजते. लोकसभेसाठी अनेक जण पात्र आहेत. मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर, माजी आमदार अंजली निंबाळकर, प्रियांका जारकीहोळीसह आपणही निवडणूक लढविण्यास तयार असल्याचे त्यांनी सांगितले. मंत्री सतीश जारकीहोळी यांना वगळून महिलांना तिकीट देण्यात यावे. मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर अथवा प्रियांका जारकीहोळी यांना तिकीट दिल्यास त्यांच्यासाठी परिश्रम घेवू, असे त्यांनी सांगितले. जारकीहोळी हे राज्याच्या राजकारणातच सक्रिय असावेत. हायकमांडने याची दखल घ्यावी. अथवा त्यांना उपमुख्यमंत्रीपद द्यावे, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. यावेळी नगरसेविका खुर्शिद मुल्ला, लता माने, रोहिणी बाबासेक, सारंबी जत्ती, हासिना पिरजादे यांच्यासह काँग्रेस कार्यकर्त्या उपस्थित होत्या.









