राहुल गांधी यांचा दावा : राउरकेलामध्ये रोड शो आयोजित
वृत्तसंस्था/ राउरकेला
काँग्रेसची भारत जोडो न्याय यात्रा बुधवारी ओडिशात दाखल झाली आहे. काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी राउरकेला, सुंदरगढमध्ये रोड शोद्वारे यात्रेला सुरुवात केली आहे. यावेळी उपस्थित काँग्रेस कार्यकर्त्यांना संबोधित करताना राहुल गांधी यांनी ओडिशात भाजप आणि बीजदमध्ये भागीदारी असल्याचे आणि काँग्रेस लोकांच्या कल्याणासाठी या दोन्ही पक्षांना विरोध करत असल्याचा दावा केला आहे.
नवीन पटनायक आणि नरेंद्र मोदी हे ओडिशात भागीदारीतून सरकार चालवितात. या दोन्ही नेत्यांनी हातमिळवणी केली आहे. बीजद संसदेत भाजपला समर्थन देतो, भाजपच्या निर्देशांवरून बीजद सरकार आमच्या पक्षाच्या नेत्यांना त्रास देत असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे.
द्वेषाच्या बाजारात मी प्रेमाचे दुकान सुरू करण्यासाठी ओडिशात आलो आहे. राज्यातील जवळपास 30 लाख लोक उपजीविकेसाठी मजूर म्हणून इतर राज्यांमध्ये गेले आहेत, राज्य सरकार या लोकांच्या कल्याणासाठी काम करत नसल्याने ही स्थिती ओढवली आहे. तर ओडिशाच्या बाहेरील 30 कोट्याधीश राज्याची संपत्ती लुटण्यासाठी राज्यात दाखल झाल्याचा दावा राहुल गांधी यांनी केला आहे.
ओडिशामध्ये आदिवासींची संख्या मोठी आहे. परंतु सरकार दलितांसोबत आदिवासींची देखील उपेक्षा करत आहे. मी येथे 6-7 तास लोकांचे म्हणणे ऐकण्यासाठी आणि 15 मिनिटांकरता माझी भूमिका मांडण्यासाठी आलोय. ओडिशात सर्वात मोठी समस्या बेरोजगारी आहे, कारण येथील उद्योगक्षेत्र योग्यप्रकारे कार्यरत नसल्याचे राहुल यांनी म्हटले आहे.
तत्पूर्वी राहुल यांनी ओडिशाच्या राउरकेलामध्ये वेदव्यास शिव मंदिरात पूजा करत भारत जोडो न्याय यात्रेला प्रारंभ केला. त्यानंतर ते उदितनगर ते पानपौष चौकापर्यंत पदयात्रेत सामील झाले. बुधवारी संध्याकाळी राजगंगापूर येथील सभेला त्यांनी संबोधित केले आहे.









