गोकुळनगर, मुतगा येथील घटना
बेळगाव : नातीला उपचारासाठी दवाखान्यात दाखल करण्यात आले होते. त्यामुळे घर बंद करून सर्वजण दवाखान्याकडे असताना रात्री चोरट्यांनी घरफोडून 1 लाख 13 हजार रुपयांचा ऐवज लांबविल्याची घटना गोकुळनगर, मुतगा येथे मंगळवारी सकाळी उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून या घटनेची नोंद मारिहाळ पोलीस स्थानकात झाली आहे. शंकर चन्नबसाप्पा इटगी (रा. गोकुळनगर-मुतगा) हे आणि त्यांचे कुटुंबीय सोमवारी रात्री दवाखान्यासाठी गेले होते. जाताना त्यांनी घराला कुलूप लावला होता. मात्र चोरट्यांनी गेटचा कुलूप, तसेच दरवाजाचा कुलूप तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर कपटातील 42 ग्रॅम सोन्याचे दागिने चोरट्यांनी लांबविले. सदर घटना पहाटे शेजाऱ्यांच्या निदर्शनास आली होती. त्यानंतर याची माहिती शंकर यांना दिली. मंगळवारी सकाळीच शंकर हे घरी परतले. त्यांनी पाहिले असता चोरट्यांनी घर फोडल्याचे दिसून आले. या घटनेची माहिती मारिहाळ पोलिसांना देण्यात आली. मारिहाळ पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला. याप्रकरणी शंकर इटगी यांनी मारिहाळ पोलीस स्थानकात चोरी झाल्याची फिर्याद दिली आहे.