जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : बेरड पदाचा अनुसूचित जमातीमध्ये समाविष्ट करण्याची मागणी
बेळगाव : वाल्मिकी नायक समाजाला पर्यायी बेरड म्हणून ओळखले जाते. सदर पदाचा अनुसूचित जमातीमध्ये समावेश करण्यात यावा, अशी मागणी करत जिल्हा वाल्मिकी समाज संघटनेतर्फे चन्नम्मा चौकातून मोर्चा काढून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करून निवेदन देण्यात आले. वाल्मिकी नायक समाजातीला पर्यायी बेड, बेडर, नायक, नाईक तसेच वाल्मिकी पदनामाने असणाऱ्यांचा अनुसूचित जमातीमध्ये समावेश करावा, अशी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. मात्र बेळगाव जिल्हा व उत्तर कर्नाटकमध्ये त्याची अंमलबजावणी झालेली नाही. अनेक ठिकाणी सदर समाजातील शालेय विद्यार्थ्यांना सरकारच्या योजनांपासून वंचित रहावे लागत आहे. अनुसूचित जमातीमधील असतानादेखील तांत्रिक दोषामुळे विद्यार्थ्यांना शैक्षणिक, आर्थिक व सरकारी नोकरी मिळविताना नुकसानीला सामोरे जावे लागत आहे.
सिंधुत्व प्रमाणपत्र मिळवितानाही अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. हा अन्याय दूर करण्यात यावा, अशी मागणी वाल्मिकी संघातर्फे सादर करण्यात आलेल्या निवेदनाद्वारे केली आहे. मुंबई-कर्नाटक भागामध्ये यापूर्वी मराठी भाषेचा प्रभाव होता. अनेक जण मराठी माध्यमामध्ये शिकले आहेत. त्यामुळे मराठी भाषिक बेडर हा शब्द बेरड असे उच्चारीत होते. या उच्चार दोषामुळे झालेली चूक सुधारून घेण्यात यावी. बेळगाव परिसरात बहुतांश नागरिक मराठीमध्येच व्यवहार करतात. यापूर्वी सरकारी कामे व सरकारी कागदपत्रे मराठीमध्येच आहेत. सरकारने याची गांभीर्याने दखल घेऊन झालेली चूक सुधारून घ्यावी, अशी मागणी वाल्मिकी सेवा संघटनेतर्फे करण्यात आली. बेरड प्रमाणपत्र असलेल्यांचा अनुसूचित जमातीमध्ये समावेश करून प्रमाणपत्र देण्यात यावे. नोकरीमध्ये असलेल्यांना या आधारावर बढती देण्यात यावी. स्थानिक चौकशी व तहसीलदारांच्या माध्यमातून प्रमाणपत्र देऊन न्याय देण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली. यावेळी संघटनेचे अध्यक्ष राजशेखर तळवार, दिनेश बागडे, पांडुरंग नायक आदी उपस्थित होते.









