शेतकरी संघटनेचे पालकमंत्र्यांना विविध मागण्यांचे निवेदन : शेतकऱ्यांच्या हिताच्या योजना राबवा
बेळगाव : राज्य सरकारकडून लवकरच अर्थसंकल्प जाहीर करण्यात येणार आहे. या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांच्या हिताच्या योजना राबवाव्यात. शेतकऱ्यांच्या कृषी उत्पन्न मालाला योग्य भाग द्यावा, कृषी क्षेत्रासाठी अधिक निधीची तरतूद करावी, अशा विविध मागण्यांचे निवेदन शेतकरी संघटनेतर्फे जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांना देण्यात आले.
प्रतिएकर 30 हजार नुकसानभरपाई द्या
राज्यामध्ये यंदा पावसाअभावी दुष्काळ परिस्थिती निर्माण झाली आहे. दुष्काळामुळे शेतकऱ्यांवर मोठे आर्थिक संकट ओढवले आहे. शेतकऱ्यांच्या व्यवसायावर मोठा परिणाम झाला आहे. यासाठी शेतकऱ्यांना आर्थिक मदत देऊन सहकार्य करण्याची आवश्यकता आहे. राज्य व केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांना दिलासा देण्याची अत्यंत गरज आहे. याची त्वरित अंमलबजावणी व्हावी. सरकारकडून पीक नुकसानभरपाईसाठी आश्वासन देण्यात आले आहे. मात्र अद्याप त्याची पूर्तता झालेली नाही. प्रतिएकर 30 हजार नुकसानभरपाई देण्यात यावी. राज्य व केंद्र सरकारने शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज माफ करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, याची जबाबदारी राज्यातील आमदारांनी घेऊन शेतकऱ्यांची बाजू मांडावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
डॉ. स्वामीनाथ आयोग अहवालाची पूर्णपणे अंमलबजावणी करा
शेतकऱ्यांविरोधी असलेले कायदे मागे घ्यावेत. शेतकरी नेत्यांवरील गुन्हे मागे घेण्यात यावे. उसापासून उपपदार्थ निर्माण करण्यात येत आहेत. यामधून अबकारी कर मोठ्या प्रमाणात मिळत आहे. यामध्ये शेतकऱ्यांनाही प्रतिटन 3 हजार रुपये देण्यात यावेत.
बेकायदेशीर मद्यविक्री बंद करा
डॉ. स्वामीनाथ यांच्या आयोगाने दिलेल्या अहवालाची पूर्णपणे अंमलबजावणी करण्यात यावी. कृषी खाते, पशुसंगोपन, साखर आयुक्तालय, बागायत खाते यांना आर्थिकरित्या सबल करून सदर खात्याच्या माध्यमातून पिके घेणाऱ्या शेतकऱ्यांना आर्थिक साहाय्य करण्याची तरतूद करावी, गावागावात सुरू असलेली बेकायदेशीर मद्यविक्री बंद करावी. पाणी पुरवठा योजनांचे विस्तारीकरण करावे, आदी मागण्या करण्यात आल्या आहेत. यावेळी चन्नप्पा पुजेरी, किसान नंदी, रविंद्र सुप्पण्णावर, सुरेश परगण्णावर, रमेश वाली आदी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.









