वृत्तसंस्था/ बेनोनी
सध्या सुरू असलेल्या 19 वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेतील पहिल्या उपांत्य फेरीतील सामन्यात भारताची गाठ यजमान दक्षिण आफ्रिकेशी पडणार आहे. आज मंगळवारी होणाऱ्या या लढतीतून अंतिम फेरीतील स्थान निश्चित करण्याच्या दृष्टीने भारत हा प्रबळ दावेदार असेल. गतविजेत्या भारताने स्पर्धेत सलग पाच विजय मिळवून उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. उत्कृष्ट अष्टपैलू प्रदर्शन घडवून त्यांनी आपले वर्चस्व दाखविले आहे.
भारताच्या घोडदौडीचा शिल्पकार म्हणून विशिष्ट विभागाकडे बोट दाखविता येणार नाही. जर फलंदाजांनी प्रतिस्पर्ध्यांना धावांचे डोंगर उभारून दबावाखाली आणले असेल, तर गोलंदाजांनीही भेदक मारा करून विजय मिळवून दिलेला आहे. किमान 130 धावांच्या फरकाने हे विजय नोंदले गेले आहेत. दोन शतके आणि एक अर्धशतकासह 18 वर्षीय मुशिर खानने या स्पर्धेत सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत अव्वल स्थान पटकावले आहे. त्याने पाच सामन्यांमध्ये 83.50 च्या सरासरीने 334 धावा केल्या आहेत.
भारताचा कर्णधार उदय सहारनही चर्चेत आहे. त्याने 61.60 च्या सरासरीने दोन अर्धशतके आणि एक शतकासह 304 धावा केल्या आहेत. सचिन धसनेही चांगली कामगिरी केलेली आहे. त्याने नेपाळविरुद्धच्या सुपर सिक्स सामन्यात 3 बाद 62 अशा बिकट परिस्थितीत भारत सापडल्यानंतर 116 धावा फटकावल्या. भारताच्या प्रत्येक प्रतिस्पर्ध्याला आतापर्यंत भारताचा उपकर्णधार आणि डावखुरा फिरकीपटू सौम्यकुमार पांडेविरुद्ध धावा काढणे कठीण झाले आहे. त्याने तीन वेळा चार बळी मिळविण्यासह 16 बळी घेतले असून या विश्वचषकातील सर्वांत यशस्वी गोलंदाजांच्या यादीत तो तिसऱ्या स्थानावर आहे.
नमन तिवारी (9 बळी) आणि राज लिंबानी (4 बळी) या वेगवान गोलंदाजांचीही पांडेच्या अचूक माऱ्याला सथ लाभलेली आहे. अलीकडेच दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मिळविलेल्या यशामुळे भारताचे पारडे अंतिम फेरीत जागा निश्चित करण्याच्या दृष्टीने आणखी जड मानले जाते. विश्वचषक मोहिमेला सुरुवात करण्यापूर्वी भारताने तिरंगी मालिकेतील सलग दोन वनडे सामन्यांमध्ये दक्षिण अफ्रिकेचा पराभव केला होता. अंतिम फेरीत भारत-पाकिस्तान अशी ब्लॉकबस्टर लढत पाहायला मिळू शकते. कारण विलोमूर पार्क येथे होणाऱ्या दुसऱ्या उपांत्य लढतीत पाकिस्तानचा सामना ऑस्ट्रेलियाशी होणार आहे. आज भारतीय फलंदाज व दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज क्वेना माफाका यांच्यातही चांगली लढत पाहायला मिळू शकते. लढत असू शकते. पाच सामन्यांमध्ये त्याने 18 बळी मिळविलेले आहेत.
संघ : भारत-उदय सहारन (कर्णधार), अर्शिन कुलकर्णी, आदर्श सिंग, ऊद्र मयूर पटेल, सचिन धस, प्रियांशू मोलिया, मुशिर खान, अरावेली अवनीश राव, सौम्यकुमार पांडे, मुगन अभिषेक, इनेश महाजन, धनुष गौडा, आराध्य शुक्ला, राज लिंबानी आणि नमन तिवारी.
दक्षिण आफ्रिका : जुआन जेम्स (कर्णधार), एसोसा आयहेवबा, रायक डॅनियल्स, क्वेना माफाका, दिवान माराईस, न्कोबानी मोकोएना, रिले नॉर्टन, रोमाशन पिल्ले, सिफो पोट्साने, एनटांडो झुमा, ल्हुआन-ड्रे प्रिटोरियस, रिचर्ड सेलेट्सवेन, स्टीव्ह स्टोल्क, डेव्हिड टीगर, ऑलिव्हर व्हाइटहेड.
सामन्याची वेळ : दुपारी 1.30 वा.









