वृत्तसंस्था/ कोलकाता
भुवनेश्वरमधील कलिंगा स्टेडियमवर खेळविण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनच्या प्रो-लिग महिलांच्या हॉकी स्पर्धेतील सामन्यात विद्यमान ऑलिम्पिक आणि विश्व विजेत्या नेदरलँड्सने यजमान भारताचा 3-1 अशा गोल फरकाने पराभव केला.
या सामन्यात नेदरलँड्सने तिसऱ्याच मिनिटाला आपले खाते पहिल्या पेनल्टी कॉर्नरवर उघडले. नेदरलँड्सच्या जेनसेनने पेनल्टी कॉर्नरवर अचूक गोल केला. नवव्या मिनिटाला भारताने नेदरलँड्सची बरोबरी साधली. भारतीय संघातील नवनीत कौरने सुनेलिता टोप्पोने दिलेल्या पासवर नेदरलँड्सच्या बचाव फळीतील खेळाडूंना तसेच गोलरक्षकाला हुलकावणी देत मैदानी गोल केला. भारताला यानंतर सामन्यातील पहिला पेनल्टी कॉर्नर मिळाला पण नवनीत कौरला या संधीचा फायदा उठवता आला नाही. सामन्यातील दुसऱ्या 15 मिनिटांच्या कालावधीत भारताला आणखी 2 पेनल्टी कॉर्नर्स मिळाले पण ते वाया गेले. नेदरलँड्सचा दुसरा गोल फे व्हॅन डेर ईलेस्टने केला. मध्यंतरापर्यंत नेदरलँड्सने भारतावर 2-1 अशी आघाडी घेतली होती. सामन्यातील तिसऱ्या 15 मिनिटांच्या कालावधीत जेनसेनने संघाचा तिसरा तर वैयक्तिक दुसरा गोल पेनल्टी कॉर्नरवर नोंदविला. या सामन्यात भारताला पेनल्टी कॉर्नर्स अधिक मिळाले पण ते वाया गेल्याने हा सामना भारताला गमवावा लागला. नवनीत कौर, गुरूजित कौर आणि उदिता यांना पेनल्टी कॉर्नरचा लाभ घेता आला नाही. या स्पर्धेत आता भारतीय महिला संघाचा पुढील सामना ऑस्ट्रेलिया बरोबर होणार आहे. या स्पर्धेतील अन्य एका सामन्यात चीनने ऑस्ट्रेलियाचा 3-0 असा एकतर्फी पराभव केला.









