राफेल समवेत अनेक विमानांचा समावेश
वृत्तसंस्था/ जैसलमेर
भारतीय वायुदल 17 फेब्रुवारी रोजी राजस्थानच्या जैसलमेरमध्ये ‘वायुशक्ति’ सरावादरम्यान स्वत:च्या शक्तीचे प्रदर्शन करणार आहे. या सरावासंबंधी वायुदलाचे उपप्रमुख एअर मार्शल ए.पी. सिंह यांनी माहिती दिली आहे. या सरावात 120 हून अधिक विमाने सामील असणार आहेत. जैसलमेर येथे होणाऱ्या हवाई सरावात 77 लढाऊ विमाने, 41 हेलिकॉप्टर्स, 5 वाहतूक विमाने आणि 12 मानवरहित प्लॅटफॉर्म्स भाग घेतील अशी माहिती देण्यात आली आहे.
राफेल लढाऊ विमान आणि प्रचंड हेलिकॉप्टर समवेत सर्व फ्रंटलाइन विमाने वायुशक्ति सरावात सामील होतील. या सरावादरम्यान आम्ही सैन्याच्या तोफा देखील एअरलिफ्ट करणार आहोत. सैन्य रुद्र हेलिकॉप्टरमधून अस्त्र डागणार असल्याचे ए.पी. सिंह यांच्याकडून सांगण्यात आले.
हवेतून हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्रांमध्ये राफेलचे एमआयसीए क्षेपणास्त्र आणि एलसीए तेजसमधून आर-73 क्षेपणास्त्रs डागण्यात येणार आहेत. जमिनीवरून हवेत मारा करणारी शस्त्रास्त्र प्रणाली समर देखील पहिल्यांदाच सरावाचा हिस्सा ठरणार आहे. वायुशक्ति सराव 1954 पासून आयोजित होत आहे. आम्ही या सरावात लक्ष्यावर अचूक बॉम्बफेक करण्याच्या स्वत:च्या क्षमतेचे प्रदर्शन करणार आहोत. भारतात निर्मित एलसीए तेजस, प्रचंड लढाऊ हेलिकॉप्टर आणि एएलएच ध्रूव यात सामील होणार असल्याचे त्यांनी सांगितले.









