शाहूपुरी पोलिसांची कारवाई, व्यापाऱ्याची तक्रार
कोल्हापूर प्रतिनिधी
प्रोटेक्शन मनी म्हणून 30 हजार रुपयांची खंडणी व्यापाऱ्याकडून उकळणाऱ्या सराईत गुंडास शाहूपुरी पोलिसांनी जेरबंद केले. सौरभ मारुती कागीनकर (वय 25, रा. कदमवाडी, कोल्हापूर) असे त्याचे नांव आहे. याबाबत व्यापारी नीरज ककुमल गोगिया (वय 23, रा. महाडिक वसाहत, कोल्हापूर) याने फिर्याद दिली होती.
याबाबत अधिक माहिती अशी की, फिर्यादी नीरज आणि खंडणीखोर गुंड सौरभ कागीनकर या दोघांनी 2018 मध्ये एका जिममध्ये ओळख झाली. ओळख वाढवून कागीनकर फिर्यादीकडे अधून मधून पैशांची मागणी करू लागला. हजार-पाचशे रुपये घेऊन तो निघून जायचा. 15 दिवसांपूर्वी त्याने फिर्यादी नीरज याच्याकडे दोन हजार रुपयांची मागणी केली. त्यावर तुला सारखे पैसे का द्यायचे? अशी विचारणा नीरज याने केली असता, प्रोटेक्शन मनी म्हणून पैसे द्यावे लागतील. नाहीतर तुझ्या दुकानात येऊन दंगा घालणार. दुकानाची तोडफोड करणार असे धमकावत त्याने दोन हजार रुपये जबरदस्तीने काढून घेतले. त्याने आजवर असे 13 हजार रुपये उकळले आहेत. त्यानंतर कागीनकर याने बुधवारी रात्री साडेसातच्या सुमारास फोन करून नीरज याला पैशांची मागणी केली. पैसे देणार नसल्याचे सांगितल्यानंतर पुन्हा फोन करून धमकावले. वन टाइम सेटलमेंट करून 30 हजार रुपये दे. नाहीतर तुला ठार मारतो, अशी धमकी त्याने दिली.
याबाबत नीरज याने शाहूपुरी पोलिस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद देताच, पोलिसांनी गुंड कागीनकर याला अटक केली. त्याच्यावर यापूर्वी मारामारीचे गुन्हे दाखल आहेत. त्याने खंडणीसाठी आणखी कोणाला त्रास दिला असल्यास तक्रारी द्याव्यात, असे आवाहन निरीक्षक अजय सिंदकर यांनी केले आहे. सहायक फौजदार संदीप जाधव यांच्यासह मिलिंद बांगर, रवी आंबेकर, बाबा ढाकणे, महेश पाटील, विवेक चौगुले यांच्या पथकाने ही कारवाई केली.
सौरभ सराईत गुंड
सौरभ कागीनकर हा सराईत गुंड आहे. त्याच्यावर यापूर्वीही चार गंभीर गुन्हे दाखल आहेत. शाहूपुरी पोलीस ठाण्यात 2017 – 18 मध्ये मारामारी, खूनाचा प्रयत्न यासारखे गुन्हे दाखल आहेत.