वृत्तसंस्था/ लंडन
इंग्लंडचे माजी सलामीवीर जेफ्री बॉयकॉट यांच्या मते, भारताचा कर्णधार रोहित शर्मा शिखर गाठल्यानंतर तेथून उतरला आहे आणि यजमानांना हैदराबादमध्ये इंग्लंडविऊद्धच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात विराट कोहलीची उणीव प्रकर्षाने जाणवली. पहिल्या डावानंतर मजबूत स्थितीचा आनंद घेत असतानाही भारताला पहिल्या कसोटीत इंग्लंडविऊद्ध 28 धावांनी पराभव पत्करावा लागला आणि पाच सामन्यांच्या मालिकेत 0-1 ने पिछाडीवर पडावे लागले.
कोहलीच्या अनुपस्थितीत रोहितच्या खांद्यावर फलंदाजीची जबाबदारी होती. परंतु तो दोन डावांत केवळ 24 आणि 39 धावाच करू शकला. शिवाय चौथ्या दिवशी खेळपट्टीवर 231 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय फलंदाजी मोठ्या प्रमाणात ढासळली. बॉयकॉटना असा विश्वास वाटत आहे की, 12 वर्षांनंतर इंग्लंडपुढे भारताला स्वगृही पराभूत करण्याची सुवर्णसंधी चालून आली आहे. बॉयकॉट यांनी ‘दि डेली टेलिग्राफ’साठीच्या आपल्या स्तंभात लिहिले आहे की, हा भारतीय संघ धक्के घेणारा आहे आणि इंग्लंडला मागील 12 वर्षांतील भारताला मालिकेत पराभूत करणारा पहिला संघ बनण्याच्या दृष्टीने सुवर्णसंधी आहे.
‘भारताला विराट कोहलीची उणीव खूप भेडसावत आहे आणि रवींद्र जडेजाच्या हाताला दुखापत झाली असून तो दुसरी कसोटी खेळणार नाही. त्यांचा कर्णधार रोहित शर्मा जवळपास 37 वर्षांचा आहे आणि तो सर्वोत्तम कामगिरी केल्यानंतर शिखरावरून उतरला आहे. त्याने चार वर्षांत मायदेशात केवळ दोन कसोटी शतके झळकावली आहेत. भारतीय संघा क्षेत्ररक्षणातही कमकुवत आहे. त्यांनी ऑली पोपला 110 धावांवर जीवदान दिले आणि त्यामुळे त्यांना 86 धावा अतिरिक्त द्याव्या लागल्या. त्यामुळे त्यांना सामना गमवावा लागला’, असे बॉयकॉटनी लिहिले आहे.
रविचंद्रन अश्विन, जडेजा आणि अक्षर पटेल हे भारतीय फिरकी त्रिकूटही फिरकीला अनुकूल हैदराबादच्या खेळपट्टीवर हवा तस प्रभाव पाडू शकले नाहीत आणि इंग्लिश फलंदाजांनी स्वीप आणि रिव्हर्स स्वीपचा वापर करून उत्तम खेळ केला. ‘इंग्लंडने त्यांच्या स्वीप आणि रिव्हर्स स्वीपच्या जोरावर भारताला धूळ चारली. 190 धावांची आघाडी घेतल्यानंतर देखील हरणे भारतासाठी धक्कादायक असेल. त्यांच्या बाबतीत मायदेशातील खेळपट्ट्यांवर यापूर्वी कधीही असे घडलेले नाही. त्यांना येथे आपण अजिंक्य आहोत असेच वाटत होते, असे बॉयकॉट यांनी लिहिले आहे.









