वृत्तसंस्था/ दुबई
नुकत्याच घोषित करण्यात आलेल्या आयसीसीच्या महिलांच्या टी-20 गोलंदाजांच्या मानांकन यादीत भारताची गोलंदाज दीप्ती शर्माने संयुक्त दुसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे. या मानांकन यादीत भारताची रेणुकासिंग ठाकुर 10 व्या स्थानावर आहे.
या मानांकन यादींत दक्षिण आफ्रिकेची मलबाचे स्थान 3 अंकांनी घसरले असून ती आता 5 व्या स्थानावर आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या 2 सामन्यात तिने केवळ 1 गडी बाद केला होता. पाकची सादिया इक्बाल दीप्ती शर्मासमवेत या मानांकन यादीत संयुक्त दुसऱ्या स्थानावर आहे. इंग्लंडची सारा ग्लेन 4 थ्या स्थानावर असून इंग्लंडची फिरकी गोलंदाज सोफी इक्लेस्टोन हिने आपले आघाडीचे स्थान अधिक भक्कम केले आहे. महिलांच्या अष्टपैलू मानांकन यादीत पहिल्या 10 क्रिकेटपटूंच्या मानांकनात कोणताच बदल झालेला नसून भारताची दिप्ती शर्मा चौथ्या स्थानावर आहे. फलंदाजांच्या मानांकन यादीत भारताची उपकर्णधार स्मृती मानधना हिने आपले चौथे स्थान कायम राखले असून जेमिमा रॉड्रिग्ज, शेफाली वर्मा आणि हरमनप्रित कौर या भारतीय खेळाडू अनुक्रमे 13 व्या, 16 व्या, आणि 17 व्या स्थानावर आहेत. ऑस्ट्रेलियाची बेथ मुनी हिने आपल्या देशाच्या ताहिला मॅकग्राला मागे टाकत अग्रस्थान मिळविले आहे. बेथ मुनीने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दर्जेदार फलंदाजी करताना 2024 च्या क्रिकेट हंगामात तिने आतापर्यंत दोन अर्धशतके झळकविली आहेत. मॅकग्रा या मानांकन यादीत दुसऱ्या स्थानावर असून दक्षिण आफ्रिकेची कर्णधार वूलव्हर्ट तिसऱ्या स्थानावर आहे.









