औद्योगिक वसाहत भयमुक्त करण्याची मागणी
बेळगाव : उद्यमबाग औद्योगिक वसाहतीतील वाढत्या चोऱ्या रोखण्यासाठी सोमवारी कारखानदारांनी पोलीस आयुक्त एस. एन. सिद्धरामप्पा यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. वाढते गुन्हे रोखण्यासाठी आवश्यक पावले उचलण्याची ग्वाही पोलीस आयुक्तांनी दिली. चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष सी. सी. होंडदकट्टी, माजी अध्यक्ष रोहन जुवळी, सचिन सबनीस आदींसह सुमारे 25 हून अधिक कारखानदारांनी पोलीस आयुक्त कार्यालयात त्यांच्याशी चर्चा केली. उद्यमबाग पोलीस स्थानकात पोलिसांची कमतरता आहे. त्यामुळे अतिरिक्त पोलीसबळ पुरविण्याची मागणीही यावेळी करण्यात आली. वाढत्या चोऱ्या रोखण्यासाठी रात्रीची गस्त वाढवावी, या परिसरात सक्रिय असणाऱ्या गुन्हेगारांवर नजर ठेवून त्यांच्या मुसक्या आवळाव्यात, स्क्रॅपच्या व्यवसायावरही नजर ठेवावी, रात्रीच्यावेळी वाहनांची तपासणी करावी, गुन्हेगारांना पकडून औद्योगिक वसाहतीत भयमुक्त वातावरण निर्माण करावे, अशी मागणी करण्यात आली.









