कुद्रेमनी गावातील शेतकऱ्यांचे 3 लाखांपेक्षा अधिक नुकसान : लोंबकळणाऱ्या वीजतारांमुळे ठिणगी उडून घडली दुर्घटना
वार्ताहर /कुद्रेमनी
लोंबकळणाऱ्या विद्युत तारांचा स्पर्श होऊन आगीची ठिणगी पडल्यामुळे कुद्रेमनी गावातील शेतकऱ्यांच्या उसमळ्याला आग लागून 3 लाखांपेक्षा अधिक किंमतीचे नुकसान झाले आहे. रविवारी दुपारी दीड-दोन वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना गावातील कामत शेतवडीत घडली. कुद्रेमनी ग्रा. पं. सदस्य शेतकरी शांताराम क. पाटील, लक्ष्मण मऱ्याप्पा पाटील, दीपक पांडुरंग पाटील असे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची नावे आहेत. यांच्या शेतवडीत विद्युत खांबावरुन जोडलेल्या तारा ढिल्या झाल्यामुळे तारांचा एकमेकांना स्पर्श होऊन ऊसमळ्यात आगीची ठिणगी पडून दुपारच्या वेळेला उन्ह असतानाच आग भडकली. तीन एकर ऊसमळा आगीच्या भक्ष्यस्थानी पडून ऊस जळून खाक झाला. त्याचबरोबर ऊसमळ्यातील पाण्याच्या पाईप, मळ्यांमध्ये ठिंबक सिंचन असणाऱ्या लहान पाईप, बोअरवेल फिल्टर व अन्य शेतीकामाचे साहित्य जळून शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. गावात यल्लम्मा देवस्थान यात्रोत्सवाची पाळक होती. तसेच क्रिकेट स्पर्धा सुरू होत्या. त्यामुळे नागरिकांचा जमाव व क्रिकेट संघातील युवकांनी ऊसमळ्याकडे धाव घेवून आग विझवण्यासाठी अथक प्रयत्न करून आग आटोक्यात आणली. अन्यथा प्रचंड एकर शेतवडीतील आणखीन ऊसमळे जळून मोठे नुकसान झाले असते. सदर शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी, अशी नागरिकांतून मागणी होत आहे.









