पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पालकांना इशारा, विद्यार्थ्यांवर अपेक्षांचे ओझे लादू नका
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
पालकांनी विद्यार्थ्यांवर आपल्या अपेक्षांचे ओझे लादणे अत्यंत अयोग्य आहे. त्यांनी आपल्या मुलांच्या रिपोर्ट कार्डाचा (गुणपत्रिका) उपयोग स्वत:च्या प्रतिष्ठेचे साधन म्हणून करु नये. मुलांचे रिपोर्ट कार्ड हे पालकांचे विझिटींग कार्ड नाही, याची त्यांनी जाणीव ठेवावी. विद्यार्थ्यांसमोर आज मोठी आव्हाने आहेत. ती पेलण्यासाठी त्यांना पालक आणि शिक्षक यांच्या संयुक्त सहकार्याची आवश्यकता असते. मुले ही पालकांची यंत्रे नाहीत, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या वार्षिक ‘परीक्षा पे चर्चा’ या कार्यक्रमात बोलताना पेले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विद्यार्थ्यांनाही काही मोलाच्या सूचना केल्या. विद्यार्थ्यांनी स्वत:ची तुलना स्वत:शीच करावी. स्पर्धा करायची तर स्वत:शीच करण्याचा प्रयत्न करावा. इतरांशी स्वत:ची तुलना करुन नये अगर त्यांच्याशी स्पर्धा करु नये. दुसऱ्यांशी स्पर्धा केल्यास मुले तणावाखाली येऊ शकतात. अतितणाव घेतल्यास त्यांची क्षमता झाकोळू शकते, अशीही मांडणी त्यांनी केली.
स्पर्धा निकोप असावी
स्पर्धा निकोप आणि निरोगी असेल तरच ती प्रोत्साहक म्हणून काम करु शकते. जे विद्यार्थी दडपण किंवा तणावासमोर झुकत नाहीत, ते इतर विद्यार्थ्यांना प्रेरणादायी ठरु शकतात. प्रत्येक विद्यार्थ्याची क्षमता भिन्न असते. पालक आणि शिक्षकांनी याची जाणीव ठेवण्याची आवश्यकता आहे. काही पालक सातत्याने आपल्या मुलांना इतर मुलांची उदाहरणे देऊन हैराण करतात. असे केल्याने मुलांवर अतिरिक्त तणाव येऊ शकतो. या तणावामुळे त्यांच्या कामगिरीवर विपरीत परिणाम होऊ शकतो. तेव्हा अशी तुलना टाळावयास हवी, अशी सूचना त्यांनी केली.
स्वत:ची तयारी महत्वाची
कोणत्याही आव्हानांचा स्वीकार करण्यासाठी विद्यार्थ्यांनी स्वत:च स्वत:ला सज्ज ठेवावे. आपले अन्य लोकांवरचे अभ्यासाचे अवलंबित्व कमी करावे. शिक्षकांनी विद्यार्थ्यांशी एक अतूट नाते निर्माण करण्याचा प्रयत्न करावा. विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यातील हा बंध विद्यार्थ्याच्या उज्ज्वल भवितव्यासाठी महत्वाचा असतो. तो बंध निर्माण करण्याचा प्रयत्न करा, असा आग्रह त्यांनी शिक्षकांना केला.
मोबाईलचा अतिउपयोग नको
आज आपण मोबाईलपासून दूर राहू शकत नाही. तथापि त्याचा अतिवापर आपल्या शरीरप्रकृतीवर परिणाम करणारा ठरु शकतो. प्रकृती ठणठणीत रहायची असेल, तर प्रतिदिन विशिष्ट वेळी व्यायाम करण्याची, खेळण्याची किंवा शरीराच्या वेगवान हालचाली करण्याची सवय ठेवणे आवश्यक आहे. शरीरप्रकृती उत्तम असेल तर झोप चांगली लागते. त्यामुळे जागेपणी तुम्ही प्रफुल्लीत राहता. मी स्वत: रात्री अंथरुणावर पडल्यानंतर केवळ अर्ध्या मिनिटातच निद्रेच्या आधीन होतो. रात्रभर मला गाढ झोप लागल्याने दिवसा पूर्ण वेळ मी नेहमीच उत्साही आणि जागृत असतो, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वत:च्या उदाहरणावरुन स्पष्ट केले. विद्यार्थ्यांनी सत्वयुक्त आणि पोषक आहार योग्यवेळी घ्यावयास हवा. त्यामुळे शरीर आणि मन स्वस्थ राहते, अशाही अनेक सूचना त्यांनी केल्या.
लिहिण्याची सवय ठेवा
अलिकडे विद्यार्थ्यांची आणि इतरांचीही लिहिण्याची सवय कमी झाली आहे. तथापि, परीक्षेच्या उत्तरपत्रिका या आजही हातानेच लिहायच्या असतात. त्यामुळे लिहिण्यात सुवाच्यता आणि वेग असणे आवश्यक आहे. हे नेहमी लिहायची सवय ठेवल्यासच शक्य आहे, असाही मोलाचा विचार त्यांनी व्यक्त केला.
परीक्षा पे चर्चाला उत्कृष्ट प्रतिसाद
या कार्यक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला आहे. केंद्र सरकारच्या पोर्टलवर या कार्यक्रमासाठी 2.26 कोटी विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या कार्यक्रमात विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना उत्तरेही दिली. एकंदरीत, असंख्य विद्यार्थ्यांच्या मनात या कार्यक्रमासंबंधीचा उत्साह दिसून आला आहे.
पंतप्रधान मोदींकडून मोलाच्या सूचना
ड विद्यार्थी, पालक आणि शिक्षक यांचे संबंध निकोप असणे आवश्यक
ड विद्यार्थ्यांसमोरच्या आव्हानांना संयुक्त रीतीने पेलण्याची आवश्यकता
ड अभ्यासासोबत विद्यार्थ्यांनी शरीर प्रकृतीसाठी व्यायाम करणे अनिवार्य









