हिंदू पक्षकारांची सर्वोच्च न्यायालयात याचिका सादर : तलावही मंदिराचाच भाग असल्याचे प्रतिपादन
वृत्तसंस्था / वाराणसी
वाराणसीच्या ज्ञानवापी क्षेत्रातील प्रतिबंधित क्षेत्रातही सर्वेक्षण केले जावे, अशी मागणी करणारी याचिका या प्रकरणातील हिंदू पक्षकारांनी सर्वोच्च न्यायालयात सादर केली आहे. ज्ञानवापीच्या तलावाच्या क्षेत्रात सर्वेक्षण करू नये, असा आदेश न्यायालयाने दिला होता. मात्र, हा तलावही प्राचीन हिंदू मंदिराचाच भाग असल्याचे प्रतिपादन हिंदू पक्षकारांनी केले आहे. याचिकेवर लवकर सुनावणी होणार आहे.
ज्ञानवापी क्षेत्रात पूर्वी मोठे हिंदू मंदिर होते. ते पाडवून औरंगजेबाच्या काळात तेथे मशीद बांधण्यात आली होती. मशिदीच्या परिसरात प्राचीन हिंदू मंदिरांचे अनेक अवशेष सापडले आहेत. पाडविल्या गेलेल्या हिंदू मंदिराच्या सामग्रीचाच उपयोग करून मशीद बांधण्यात आली आहे, असा स्पष्ट निष्कर्ष भारतीय पुरातत्व विभागाने न्यायालयाच्या आदेशावरुन या क्षेत्रात सर्वेक्षण करून काढला आहे. या सर्वेक्षणाचा अहवाल काही दिवसांपूर्वीच प्रसिद्ध करण्यात आला आहे.
सर्वांसमक्ष सर्वेक्षण
या परिसराचे सर्वेक्षण केले जात असताना तेथे सर्व बाजूंचे पक्षकार आणि त्यांचे वकील उपस्थित होते. तसेच सर्वेक्षण करणाऱ्या तज्ञांमध्ये दोन मुस्लीमांचाही समावेश होता. त्यांनी शास्त्रशुद्ध सर्वेक्षण करून तेथे मशीदीच्या स्थानीच पूर्वी हिंदू मंदिर होते, असा निष्कर्ष काढला असून अहवाल न्यायालयाला सादर केला आहे.
तलाव सर्वेक्षणाला प्रतिबंध
ज्ञानवापीच्या तलावात प्राचीन शिवलिंग आढळले होते. ते शिवलिंग नसून तो तलावातील कारंजा आहे, असे मुस्लीम पक्षाचे म्हणणे आहे. या शिवलिंगाचेही शास्त्रीय पद्धतीने सर्वेक्षण व्हावे, अशी मागणी हिंदू पक्षकारांनी केली होती. तथापि, असे सर्वेक्षण करताना या शिवलिंगाची हानी होऊ शकते, असे मत व्यक्त करत सर्वोच्च न्यायालयाने हा तलाव प्रतिबंधित केला होता. तसेच त्याच्या सर्वेक्षणाला स्थगिती दिली होती. आता या संपूर्ण परिसरात पूर्वी हिंदू मंदिरच होते, हे भारतीय पुरातत्व विभागाने स्पष्ट केल्याने प्रतिबंधित क्षेत्रातही सर्वेक्षणास अनुमती द्यावी, जेणेकरुन पूर्वीच्या मंदिराचे अस्तित्व अधिक स्पष्ट होईल. त्यामुळे स्थगिती त्वरित उठविण्यात यावी, अशी मागणी याचिकेद्वारे हिंदू पक्षकारांनी आता केली आहे.
सर्वेक्षणाचा आदेश द्या
ज्या स्थानी शिवलिंग आढळले आहे, तेथे सर्वेक्षण करण्याचा आदेश आता सर्वोच्च न्यायालयाने भारतीय पुरातत्व विभागाला द्यावा, अशी मागणी हिंदू पक्षकारांच्या याचिकेत करण्यात आली आहे. 19 मे 2023 या दिवशी सर्वोच्च न्यायालयाने या भागाच्या सर्वेक्षणास स्थगिती दिली होती. आता ती उठविण्याची आवश्यकता आहे, असे हिंदू पक्षकारांचे वकील विष्णू शंकर जैन यांचे म्हणणे आहे. त्यांनी सादर केलेल्या याचिकेत या प्रकरणाचा घटनाक्रम देण्यात आला आहे.
प्रकरण नेमके काय आहे ?
वाराणसीत सध्याच्या ज्ञानवापी परिसरात पुरातन काळापासून एक मोठे हिंदू शिवमंदिर अस्तित्वात होते. सतराव्या शतकात हे मंदिर औरंगजेबाच्या आदेशावरुन पाडण्यात आले. त्यानंतर मंदिराच्या स्थानी मशीदीचे बांधकाम करण्यात आले. औरंगजेब हा धर्मांध सत्ताधीश असल्याने त्याने हिंदूंची अनेक मंदिरे पाडविण्याचा आदेश अशा प्रकारे त्याच्या सत्ताकाळात दिला होता, असा इतिहास आहे. नंतर पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी नवे शिवमंदिर मशिदीच्या शेजारी निर्माण केले, जे आज काशीविश्वेश्वराचे मंदिर म्हणून परिचित आहे. मात्र, ते मूळ मंदिर नाही. आता हिंदू पक्षकारांची मागणी मूळ मंदिराच्या स्थानी नवे मंदिर बांधण्यात यावे, अशी आहे. त्यासाठी वाराणसीच्या कनिष्ठ न्यायालयात प्रकरण सुरू आहे.
याचिकेत माहिती सादर
ड हिंदू पक्षकारांच्या नव्या याचिकेत प्रकरणाची सर्व माहिती सादर
ड तलाव परिसराचे तसेच शिवलिंगाचेही सर्वेक्षण करण्याची मागणी
ड हा परिसर हिंदू मंदिराचाच असल्याचा पुरातत्व विभागाचा निष्कर्ष









