खासदार इराण्णा कडाडी यांचे सूतोवाच : शेट्टर यांच्या घरवापसीवर प्रतिक्रिया
बेळगाव : राम मंदिराच्या उद्घाटनानंतर देशामध्ये राजकीय वातावरण बदलले आहे. तसेच राज्यामध्येही राजकीय वर्तुळात मोठे बदल होणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाला पाठबळ देण्यासाठी माजी मंत्री जगदीश शेट्टर यांनी पुन्हा भाजपात प्रवेश केला आहे. त्यामुळे भविष्यात राजकीय घडामोडींना वेग येणार आहे, असे राज्यसभा सदस्य इराण्णा कडाडी यांनी सांगितले. यावेळी ते म्हणाले, आमच्या राज्यातही एकनाथ शिंदे, अजित पवार आहेत, असे सांगत भविष्यातील राजकीय घडामोडींचे सूचक वक्तव्य केले. येथील जुन्या जिल्हा पंचायत कार्यालयातील कडाडी यांच्या कक्षात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. राम मंदिराच्या उद्घाटनानंतर देशामध्ये मोठे राजकीय बदल झाले आहेत. त्यामुळे जनतेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाला पसंती दर्शविली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात मोठ्या प्रमाणात राजकीय घडामोडी घडणार आहे. अनेक जण भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत, असे कडाडी यांनी सांगितले.
शेट्टर यांचे कुटुंबीय पहिल्यापासूनच भाजपशी संलग्न आहेत. त्यामुळे काँग्रेसमध्ये त्यांना अपेक्षित स्थान दिले गेले नव्हते. त्यामुळेच ते पुन्हा भाजपमध्ये परतले आहेत. गेल्या विधानसभा निवडणुकीदरम्यान घडलेल्या काही राजकीय घडामोडीतून त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. मात्र, तेथील वातावरण त्यांना मानवले नाही. या कारणाने त्यांनी भाजपप्रवेश केला आहे. पक्षामध्ये त्यांना योग्य स्थान दिले जाईल. पक्ष त्यांच्या कार्याची दखल घेऊन आहे. भविष्यात अनेक मातब्बर नेते भाजपमध्ये प्रवेश घेणार असल्याचे कडाडी यांनी सांगितले. महाराष्ट्रामध्ये ज्याप्रमाणे सत्तांतर झाले तसेच राजकीय सत्तांतर कर्नाटकामध्ये होऊ शकते. काँग्रेसमधील अनेक नेते असंतुष्ट आहेत. विकासकामांसाठी निधी दिला जात नसल्याने नेत्यांना मतदारसंघात फिरणेही कठीण झाले आहे. जनता विकासकामे विचारत आहे. त्यामुळे राजकीय घडामोडी घडण्याची शक्यता अधिक असल्याचे कडाडी यांनी सांगितले.









