स्वामी अभेदानंद : चिन्मय मिशनतर्फे व्याख्यान
बेळगाव : अपेक्षा, अहंकार, भीती, मोह यामुळे संसारात दु:खाची दरी वाढत जाते. आपला मोहच आपल्याला पाठीमागे ओढतो. अशा स्थितीत भगवंतासमोर नि:स्वार्थपणे बसायला हवे. जीवन हा मोठा उत्सव असून तो आनंदाने साजरा करायला हवा, असे उद्गार स्वामी अभेदानंद यांनी काढले. चिन्मय मिशन बेळगावतर्फे आयोजित व्याख्यानात ते ‘गीता में साधक की यात्रा’ या विषयावर बोलत होते. गोगटे कॉलेजच्या के. के. वेणुगोपाल सभागृहात हा कार्यक्रम झाला. चिन्मय मिशनचे अध्यक्ष अभय कुलकर्णी, सचिव गिरीश इनामदार, व्यवस्थापक ट्रस्टी राजेंद्र केकरे, आचार्या स्वामिनी प्रज्ञानंदा आदींच्या हस्ते दीपप्रज्वलन झाले. अमेय कुलकर्णी यांनी परिचय करून दिला. स्वामी अभेदानंद म्हणाले, दु:ख पदरी आले की आपली परिस्थिती कठीण आहे, असे आपण समजतो. त्यामुळे पुन्हा दु:खात वाढ होते. इच्छेविरुद्ध घडल्यास मनुष्य दु:खी होतो. प्रेम आणि आसक्ती वेगळे आहेत. आसक्ती आपल्याला कमजोर करते. जीवनात वास्तवाला स्वीकारले पाहिजे, असा सल्लाही त्यांनी दिला. आपले सैरभैर अंतर्मन दु:खी झाल्याने अपेक्षा भंग होतात. दु:ख ही माणसाची सवय झाली आहे. न मिळणाऱ्या गोष्टीच्या मागे लागून मनुष्य विनाकारण दु:खी होतो. दुसऱ्याचे दु:ख स्वत:वर ओढून घेण्याचा त्याचा स्वभाव आहे. त्यामुळे दु:खातून आपण बाहेर येऊन साधना केली पाहिजे. गीता ही भगवंतांची देणगी आहे. ईश्वर विद्या देत नाही, तोपर्यंत आपल्याकडे विद्या येत नाही, असेही त्यांनी सांगितले.









