एका वर्षात 40 हजार वाहनांची भर : सध्या 4 लाख 74 हजार वाहने रस्त्यांवर : प्रादेशिक परिवहन विभागाची माहिती
बेळगाव : बेळगावमधील वाहतूक कोंडी दिवसेंदिवस वाढत आहे. येथून मार्ग काढण्यासाठी अनेक महत्त्वाच्या मार्गांवर एकेरी वाहतूक करण्यात आली. परंतु, वाहतूक कोंडी मात्र काही केल्या कमी होताना दिसत नाही. बेळगावमधील वाहनांच्या संख्येतही दिवसेंदिवस वाढ होत आहे. जानेवारी ते डिसेंबर 2023 या वर्षात नवीन 39 हजार 557 वाहनांची भर पडली आहे. त्यामुळे बेळगाव विभागात सध्या 4 लाख 74 हजार वाहने रस्त्यांवर धावत असल्याची माहिती प्रादेशिक परिवहन विभागाने दिली. बेळगावचा विस्तार ज्या गतीने होत आहे, त्याच गतीने वाहनांच्या संख्येतही वाढ होत आहे. एकूण लोकसंख्येचा विचार करता 80 ते 85 टक्के लोकांकडे वाहने असल्याचे दिसून येत आहे. प्रादेशिक परिवहन विभागाच्या आकडेवारीनुसार मागील वर्षभरात 39 हजार 557 वाहनांची नोंद झाली आहे. नवीन वाहनांमध्ये दुचाकीचे प्रमाण सर्वाधिक आहे. 29 हजार 934 दुचाकी, 5240 चारचाकी, 2005 मालवाहक तर 2378 इतर वाहनांचा यामध्ये समावेश आहे.
कर चुकविण्यासाठी अन्य राज्यात धाव
देशात सर्वात कमी वाहनावरील कर हा पुदुच्चेरी या केंद्रशासित प्रदेशात लागू आहे. इतर राज्यांच्या तुलनेत कर कमी असल्याने बरीच आलिशान वाहने कर चुकविण्यासाठी पुदुच्चेरी येथून आणली जातात. बेळगावमध्ये ‘पीवाय’ पासिंगची अनेक आलिशान वाहने फिरताना दिसतात. ही सर्व वाहने पुदुच्चेरी येथून नोंदणी करून बेळगावमध्ये आणली जातात. त्यामुळे वाहन नोंदणी संख्या कमी आहे.
इतर राज्यांमधील वाहनांची संख्या अधिक
बेळगाव जिल्हा हा महाराष्ट्र व गोवा या दोन राज्यांच्या सीमेवर असल्याने या दोन्ही राज्यांमधून वाहने खरेदी करून बेळगावमध्ये आणली जातात. विशेषत: गोवा राज्यात वाहनावरील कर कमी असल्याने बेळगावमधील अनेक ग्राहक गोवा येथील रहिवासी दाखवून वाहन खरेदी करतात. यामुळे प्रत्येक वाहनामागे टॅक्स वाचविला जात असल्याने गोवा येथून नवीन वाहनांची खरेदी केली जाते. याबरोबरच मुंबई-पुणे येथील जुनी वाहने मोठ्या प्रमाणात बेळगावमध्ये विक्री केली जातात. त्यामुळे बेळगावमधील नवीन वाहन खरेदी काहीशी कमी होत आहे.
बेळगाव विभागातील वाहनांची आकडेवारी (31 डिसेंबरपर्यंत)
- वाहनांचा प्रकार संख्या
- दुचाकी 3 लाख 66 हजार 580
- मोपेड 7 हजार 183
- कार 60 हजार 736
- ट्रॅक्टर 5 हजार 528
- रिक्षा 4 हजार 455
- गुड्स कॅरिअर 17 हजार 378
- बस 9 हजार 247
- रुग्णवाहिका 204
वाहन खरेदी संख्येत वाढ
मागील काही वर्षांचा विचार करता वाहनांची संख्या प्रत्येक वर्षी वाढत आहे. बेळगाव विभागात यावर्षी वाहन खरेदीची संख्या वाढली आहे. दुचाकीबरोबरच चार चाकीचीही खरेदी मोठ्या प्रमाणात करण्यात आली आहे. त्याबरोबरच जुनी वाहने स्क्रॅप पॉलिसीअंतर्गत निकामी केली जात आहेत.
– नागेश मुंडास (प्रादेशिक परिवहन अधिकारी)









