सापाला जीवदान : पशुवैद्यांकडून उपचार : माणुसकीचे दर्शन
बेळगाव : भुतरामहट्टी येथे जखमी अवस्थेत सापडलेल्या नागसापावर पशुसंगोपनच्या मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यामुळे सापाला जीवदान मिळाले आहे. पशुसंगोपन दवाखान्यात विविध जखमी प्राण्यांवर शस्त्रक्रिया करून उपचार केले जात आहेत. बेळगावात प्रथमच सापावर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. भुतरामहट्टी येथील रस्त्याशेजारी खोदकाम सुरू असताना जेसीबीचे दात लागून साप जखमी झाला होता. दरम्यान, केदनूर येथील सर्पमित्र केतन राजाई यांना पाचारण करण्यात आले होते. त्यांनी तातडीने दाखल होऊन जखमी झालेल्या सापाला मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये आणले. दरम्यान, मुख्य पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. एच. बी. सन्नक्की यांच्या नेतृत्वाखाली गंभीर जखमी असलेल्या सापावर शस्त्रक्रिया करण्यात आली. सापाच्या मानेला आणि कंबरेला गंभीर दुखापत झाली होती. त्यामुळे पशुवैद्यांनी 40 टाके घालून उपचार केले. उपचारानंतर पुढील संगोपनासाठी साप सर्पमित्रांच्या हाती स्वाधीन केला आहे. शिवाय सदर सापावर सर्पमित्र उपचार करत असल्याची माहिती मिळाली आहे. या मदत कार्यामुळे माणुसकीचे दर्शन घडले आहे. बेळगाव परिसरात सापांची संख्या वाढू लागली आहे. विषारी आणि बिनविषारी सापांची संख्याही अधिक आहे. अलीकडेच हिंडाल्को परिसरात दोन अजगर साप सापडले होते. सर्पमित्राच्या साहाय्याने त्यांना नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले. त्यानंतर पुन्हा गंभीर जखमी अवस्थेत सापडलेल्या सापावर माणवतेचे दर्शन घडवत यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. त्यामुळे सापाला जीवदान मिळाले आहे.
सापाची हालचाल पूर्वीप्रमाणेच
जखमी अवस्थेत असलेल्या सापाला सर्पमित्रांनी दवाखान्यात घेऊन येताच तातडीने त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यामुळे साप पूर्ववतपणे हालचाल करू लागला आहे. यासाठी दवाखान्यातील इतर पशुवैद्य व कर्मचाऱ्यांचीही साथ लाभली आहे.
-डॉ. एच. बी. सन्नक्की, मुख्य पशुवैद्यकीय अधिकारी









