गावासाठी विविध फंडांतून 1 कोटी 23 लाखाचा निधी मंजूर : यात्रेपूर्वी विकासकामे पूर्ण करण्याचा निर्धार
खानापूर : बेकवाड येथील महालक्ष्मी यात्रा फेब्रुवारी 28 रोजी भरवण्यात येणार आहे. या निमित्त बेकवाड ग्राम पंचायतीच्या माध्यमातून बेकवाड गावातील विविध विकासकामे हाती घेण्यात आली आहेत. गावासाठी विविध योजनांच्या माध्यमातून 1 कोटी 23 लाखाचा निधी मंजूर झाला असून या निधीतून गटार, रस्ते, पाणी व्यवस्था, वीजपुरवठा यासह इतर विकासकामे हाती घेण्यात आली आहेत. सर्व विकासकामे यात्रेपूर्वी पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती ग्रा. पं. विकास अधिकारी नागाप्पा बन्नी यांनी ‘तरुण भारत’शी बोलताना दिली.
बेकवाड येथील महालक्ष्मी यात्रा 18 वर्षांनी भरवण्यात येत आहे. यासाठी आमदार विठ्ठल हलगेकर आणि माजी आमदार अरविंद पाटील यांच्या प्रयत्नातून एनआरजी, आमदार निधी, पंधरावा वित्त आयोग, अमृत सरोवर अशा विविध योजनांच्या माध्यमातून बेकवाडच्या विकासासाठी 1 कोटी 23 लाखाचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या निधीतून गावातील सीसी रस्ते करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. तर काही रस्त्यांवर पेव्हर्स घालण्याचे काम सुरू आहे. तसेच गावातील गटारी नव्याने बांधणे आणि काही गटारींची दुरुस्ती करून साफसफाई करण्याचे कामही हाती घेण्यात आले आहे. तसेच गावातील पिण्याच्या पाण्यासाठी ठिकठिकाणी पाण्याच्या टाक्या नव्याने बसवण्यात येत असून यासाठी कूपनलिकाही खोदण्यात आल्या आहेत.
अमृत सरोवर योजनेंतर्गत 13 लाखाचा निधी मंजूर झाला असून तलावाच्या विकासाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. तसेच एनआरजीमधून 58 लाखाचा निधी मंजूर झाला आहे. आमदार निधीतून 10 लाखाचा निधी मंजूर झाला आहे. तसेच पंधराव्या वित्त आयोगामार्फत 16 लाखाचा निधी मंजूर झाला आहे. या निधीतून इतर विकासकामेही हाती घेण्यात आली आहेत. यात्रेपूर्वी बेकवाड येथील सर्व विकासकामे पूर्ण करण्यात येणार आहेत. यात्रोत्सवाच्या काळात येणाऱ्या भक्तांची चोख व्यवस्था होण्यासाठी नियोजन करण्यात आले आहे. बेकवाड येथील विद्युतपुरवठा सुरळीत व्हावा यासाठी ट्रान्स्फॉर्मर आणि विद्युतखांब उभारण्यात आले आहे. त्यामुळे विद्युतपुरवठाही सुरळीत होण्यासाठी नियोजन करण्यात आले आहे. यात्रेनिमित्त बेकवाड, बंकी, बसरीकट्टी, खैरवाड, हडलगा या गावांचा निधी बेकवाडच्या संपूर्ण विकासकामासाठी वळविण्यात आला आहे. भविष्यातील एनआरजी निधी आणि इतर निधीतून या गावांच्या विकासासाठी प्राधान्य देण्यात येणार असल्याचे यावेळी बन्नी यांनी सांगितले.









