शोकसभेत संपादक जयवंत मंत्री यांचे प्रतिपादन
बेळगाव : मतभिन्नता असली तरी निर्भेळ मैत्री कशी असावी, याचे उत्तम उदाहरण म्हणून पत्रकार प्रशांत बर्डे यांचे नाव घ्यावे लागेल. त्यांच्या निधनाने एक अभ्यासू पत्रकार हरपला आहे, असे मत ‘तरुण भारत’चे संपादक जयवंत मंत्री यांनी व्यक्त केले. पत्रकार प्रशांत बर्डे यांच्या निधनाबद्दल मंगळवारी जत्तीमठ येथे शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी हे मत व्यक्त केले. यावेळी बर्डे यांच्या सहवासातील आठवणींना त्यांनी उजाळा दिला. नवहिंद क्रीडा केंद्राचे अष्टेकर यांनी बर्डे यांचे विचार बहुजन समाजाला तारणारे होते, असे सांगितले. रवी नाईक यांनी आपल्या वर्गमित्राला आदरांजली वाहून राजकीय नेते, अधिकारी ते सामान्य नागरिक यांच्यापर्यंत त्यांचा कसा संपर्क होता, याची विविध उदाहरणे दिली. प्रशांत बर्डे नेहमीच महाराष्ट्र एकीकरण समितीशी प्रामाणिक व एकनिष्ठ राहिले. अन्यायाची त्यांना चीड होती, पण सदैव मदतीस तत्पर होते, असे प्रकाश मरगाळे यांनी सांगितले. प्रशांत बर्डे यांचा बेळगावातील गल्लोगल्लीतील कार्यकर्त्यांशी उत्तम संपर्क होता. पत्रकारांना मार्गदर्शन करतानाच वृत्तपत्र विक्रेत्यांनाही त्यांनी मदत केली, याचा उल्लेख नेताजी जाधव यांनी करून दिला. प्रकाश अष्टेकर, प्रकाश जाधव, कुंतीनाथ कलमनी, वृत्तपत्र विक्रेते प्रताप भोसले, शिवराज पाटील यांच्यासह अन्य उपस्थित पत्रकारांनी बर्डे यांच्याबद्दलच्या भावना व्यक्त करून त्यांना आदरांजली वाहिली. यावेळी बर्डे यांचे भाऊ चंद्रशेखर बर्डे यांच्यासह पत्रकार व विक्रेते उपस्थित होते.









