वार्ताहर /काकती
अयोध्या येथील राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा उत्साह काकतीतील घराघरात सोमवारी ओसंडून वाहत होता. येथील मंदिरातून धार्मिक कार्यक्रम गावातील प्रमुख गल्लीतून श्रींची पालखी, प्रभू श्रीरामाच्या रथाची शोभायात्रा हजारो ग्रामस्थ व भाविकांच्या अभूतपूर्व सहभागात पार पडला. गावातील सर्व मंदिरांतून सकाळपासून अभिषेक, पूजा, अर्चा श्रीराम स्तोत्र पठण, हनुमान चालीसा अशी रेलचेल होती. दुपारी 3 नंतर भावकाई गल्ली येथील श्री भावकाई मंदिर, श्री विठ्ठाप्पा मंदिर येथून श्रींची पालखी व शोभायात्रेला सुरुवात झाली. या शोभायात्रेत सुशोंभित केलेल्या बैलजोड्या, सुवासिनी डोक्यावर कुंभकलश घेऊन लाल-भगव्या साड्या नेसून सहभागी झाल्या होत्या. सर्वत्र भगवे ध्वज व पताका लावून रस्ते सजविले होते. घरांच्या दारासमोर आकर्षक रांगोळी काढून, श्रीरामाचे तैलचित्र असलेल्या स्वागत कमानी यामुळे श्रीरामाची विजय पताका झळकते अंबरी.. असे वाटत होते. मिरवणुकीत श्रीराम जय राम जय जय राम अशा जयघोषाच्या गजरात वारकरी तल्लीन होते. रथात प्रभू श्रीराम, सीता, लक्ष्मण यांच्या वेषभूषेतील बालचमूनी लक्ष वेधून घेतले होते. श्री सिध्देश्वर मंदिर येथे शोभायात्रेची सांगता तब्बल दोन तासाने सायंकाळी झाली. संध्याकाळी सातनंतर श्री सिध्देश्वर मंदिरात सहस्त्र दीपोत्सव व महाआरती झाली. रात्री 8 नंतर ग्रामस्थांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.









