वृत्तसंस्था/ ईस्ट लंडन
आयसीसीच्या 19 वर्षाखालील वयोगटातील खेळविण्यात आलेल्या सामन्यात बांगलादेशने आयर्लंडचा 6 गड्यांनी पराभव केला. या सामन्यात बांगलादेशच्या मोहम्मद शिहाब जेम्सला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले.
या सामन्यात बांगलादेशने नाणेफेक जिंकून आयर्लंडला प्रथम फलंदाजी दिली. आयर्लंडने 50 षटकात 8 बाद 235 धावा जमविल्या. त्यानंतर बांगलादेशने 46.5 षटकात 4 बाद 239 धावा जमवित हा सामना 6 गड्यांनी आणि 19 चेंडू बाकी ठेऊन जिंकला. बांगलादेशच्या डावात नाबाद अर्धशतक झळकविणाऱ्या मोहम्मद शिहाब जेम्सला सामनावीर म्हणून जाहीर करण्यात आले.
आयर्लंडच्या डावामध्ये हिल्टनने 113 चेंडूत 1 षटकार आणि 11 चौकारांसह 90, जॉर्डन निलने 47 चेंडूत 5 चौकारांसह 31, कर्णधार रॉक्सने 13, मॅकबेथने 2 चौकारांसह 27, मॅक्नेलीने 1 चौकारासह 23 धावा जमविल्या. आयर्लंडच्या डावात 1 षटकार आणि 22 चौकार नोंदविले गेले. मॅकबेथ आणि हिल्टन यांनी पाचव्या गड्यासाठी 81 धावांची भागिदारी केली. आयर्लंडच्या डावात 29 अवांतर धावा मिळाल्या. त्यामध्ये 22 वाईड चेंडूंचा समावेश आहे. बांगलादेशतर्फे मारुफ म्रिदा आणि शेख परवेज जीबन यांनी प्रत्येकी 2 तर बोर्सन, रफी व रेहमान यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
प्रत्युत्तरादाखल खेळताना बांगलादेशच्या डावामध्ये सलामीच्या आशिकर सिबलीने 60 चेंडूत 3 चौकारांसह 44 धावा जमविताना आदिल सिदक्कीसमवेत पहिल्या गड्यासाठी 90 धावांची भागिदारी केली. सिदक्कीने 63 चेंडूत 3 चौकारांसह 36 धावा जमविल्या. मोहम्मद रिझवानने 29 चेंडूत 1 चौकारासह 21, आरिफुल इस्लामने 1 षटकारासह 13 धावा केल्या. रिझवान बाद झाला त्यावेळी बांगलादेशची स्थिती 27.3 षटकात 4 बाद 130 अशी होती. त्यानंतर अहरार आमिन आणि मोहम्मद शिहाब जेम्स यांनी पाचव्या गड्यासाठी अभेद्य 109 धावांची शतकी भागिदारी करुन आपल्या संघाला 19 चेंडू बाकी ठेवत 6 गड्यांनी विजय मिळवून दिला. आमिनने 63 चेंडूत 1 षटकार आणि 3 चौकारांसह नाबाद 45 तर जेम्सने 54 चेंडूत 5 चौकारांसह नाबाद 55 धावा झळकाविल्या. बांगलादेशला अवांतराच्या रुपात 25 धावा मिळाल्या. बांगलादेशच्या डावामध्ये 2 षटकार आणि 28 चौकार नोंदविले गेले. आयर्लंडतर्फे मॅकबेथने 41 धावात 2 तर मॅक्नेली आणि वेल्डन यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
संक्षिप्त धावफलक – आयर्लंड 50 षटकात 8 बाद 235 (कियान हिल्टन 90, मॅकबेथ 27, जॉर्डन निल 31, मॅक्नेली 23, अवांतर 29, म्रिदा 2-45, शेख परवेज जीबन 2-54, बोर्सन, रफी, रेहमान प्रत्येकी 1 बळी), बांगलादेश 46.5 षटकात 4 बाद 239 (शिबली 44, सिदक्की 36, मोहम्मद रिझवान 21, आरिफुल इस्लाम 13, आमिन नाबाद 45, जेम्स नाबाद 55, अवांतर 25, मॅक बेथ 2-41, मॅक्नेली 1-23, वेल्डन 1-46).









