वार्ताहर /धामणे
अयोध्येमध्ये प्रभू श्रीराम मंदिर लोकार्पण सोहळा आणि प्रभू श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा सोमवार दि. 22 रोजी मोठ्या भक्तीभाव व उत्साहाने जय जय श्री रामाच्या जयघोषात पार पडला. त्याच धर्तीवर ग्रामीण भागातील धामणे, नंदिहळ्ळी, सुळगा (ये.), राजहंसगड, देसूर, नागेनहट्टी, अवचारहट्टी, मासगौंडहट्टी भागात उत्साही वातावरणात विविध कार्यक्रम व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. धामणे येथील श्री विठ्ठल रखुमाई मंदिरात सोमवारी येथील वारकऱ्यांच्या वतीने पहाटे 4 ते 6 काकड आरती, त्यानंतर सकाळी 9 ते दुपारी 12 वा. श्रीराम प्रभूच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले व मूर्तीवर पुष्पवृष्टी करून आरती झाली. त्याचप्रमाणे येथील मारुती मंदिरात हनुमान चालीसा पठण व रामनामाचा जप करण्यात आला. सायंकाळी महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. गावात प्रत्येक घरावर भगवा ध्वज व प्रत्येक गल्लीत भगव्या पताका लावल्यामुळे गावातील वातावरण प्रभू श्रीराममय झाले आहे.
देसूरमध्ये भगवेमय वातावरण
देसूर येथील श्रीराम मंदिरात येथील भाविकांच्या वतीने प्रभू श्रीराम देवाच्या मुर्तीला अभिषेक घालून विधीवत पूजन करण्यात येवून आरती करण्यात आली. व संध्याकाळी महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. तत्पूर्वी सकाळी प्रत्येक घराच्या अंगणात रांगोळ्या घालण्यात येवून प्रत्येक घरावर भगवे ध्वज लावले होते.
नंदिहळ्ळीत श्रीराम पालखी सोहळा
नंदिहळ्ळी येथे श्री विठ्ठल रखुमाई मंदिर येथून प्रभू श्रीरामाच्या पालखीची भव्य मिरवणूक काढण्यात आली. टाळ मृदंगाच्या गजरात ही मिरवणूक गावभर फिरून पुन्हा विठ्ठल रखुमाई मंदिर आवारात आरतानंतर मिरवणुकीची सांगता झाली.
मासगौंडहट्टी येथे श्रीरामाच्या मूर्तीची सवाद्य मिवरणूक
मासगौंडहट्टी येथे सकाळी प्रभू श्रीरामाच्या मूर्तीची सवाद्य मिरवणूक काढण्यात येवून महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. तसेच ध. संभाजी चौक, कुरबरहट्टी येथील ब्रम्हलिंग युवक मंडळातर्फे पालखीची संवाद्य मिरवणूक काढण्यात येऊन ब्रम्हलिंग मंदिर येथे महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.









