वृत्तसंस्था/ जकार्ता
विश्व बॅडमिंटन फेडरेशनच्या येथे मंगळवारपासून इंडोनेशियन मास्टर्स सुपर 500 दर्जाच्या आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेला प्रारंभ होत आहे. या स्पर्धेत भारताचे आव्हान प्रामुख्याने एच. एस. प्रणॉयच्या कामगिरीवर राहिल. मात्र पुरूष दुहेरीची जोडी सात्विक साईराज आणि चिराग शेट्टी यांनी मात्र स्पर्धेतून माघार घेतली आहे.
अलिकडच्या कालावधीत सात्विक साईराज आणि चिराग शेट्टी यांनी मलेशिया सुपर 1000 दर्जाच्या तसेच त्यानंतर नुकत्याच झालेल्या इंडिया खुल्या सुपर 750 दर्जाच्या बॅडमिंटन स्पर्धेत पाठोपाठ उपविजेतीपदे मिळविली. सात्विक आणि चिराग हे आशियाई स्पर्धेतील विद्यमान विजेते आहेत. सलग स्पर्धांमुळे या जोडीवर अधिक ताण पडत असल्याने त्यांनी इंडोनेशियन स्पर्धेतून माघार घेतली आहे. पुरूष एकेरीत भारताची भिस्त प्रामुख्याने नवव्या मानांकित एच. एस. प्रणॉयवर राहिल. या स्पर्धेत प्रणॉयचा सलामीचा सामना सिंगापूरच्या लोहकिन येव बरोबर होणार आहे. अकराव्या मानांकित येवने प्रणॉयवर आतापर्यंत एकदाच विजय मिळविला. तर त्याला चार सामन्यात प्रणॉयकडून हार पत्करावी लागली आहे. गेल्या वर्षी प्रणॉयने मलेशियन मास्टर्स स्पर्धा जिंकली होती. तर ऑस्ट्रेलियन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत उपविजेतेपद मिळविले होते. गेल्या वर्षी झालेल्या विश्व बॅडमिंटन स्पर्धेत प्रणॉयने कांस्यपदक घेतले होते. मात्र चालू वर्षीच्या मलेशिया बॅडमिंटन स्पर्धेत त्याला पहिल्या फेरीतच पराभूत व्हावे लागले होते. पुरूष एकेरीत लक्ष्य सेनचा सलामीचा सामना चीनच्या वेंग यांगशी होणार आहे. किदांबी श्रीकांतचा सलामीचा सामना मलेशियाच्या ली जियाशी होणार आहे. चिराग आणि सात्विक यांच्या गैरहजेरीत आता भारताची अर्जुन आणि ध्रुव कपिला ही जोडी दुहेरीत खेळणार आहे.









