वृत्तसंस्था/ विझ्क आन झी (नेदरलँड्स)
येथे सुरू असलेल्या टाटा स्टील मास्टर्स आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत भारतीय ग्रँडमास्टर डी. गुकेशने पाचव्या फेरीतील डावात रशियन ग्रँडमास्टर इयान नेपोमिनाचेचीला पराभवाचा धक्का देत पूर्ण एक गुण वसूल केला. गुकेशचा या स्पर्धेतील हा दुसरा विजय आहे.
या स्पर्धेच्या गुणतक्त्यात पाचव्या फेरीअखेर गुकेशने 2.5 गुण मिळविले आहेत. या स्पर्धेतील पहिल्या चार फेऱ्यांमध्ये त्याने दोन सामने गमविले आहेत. पाचव्या फेरीतील अन्य एका पटावर झालेल्या लढतीत ग्रँडमास्टर आर. प्रग्यानंदने हॉलंडचा विद्यमान विजेता अनिश गिरीला बरोबरीत रोखले. भारताचा ग्रँडमास्टर विदित गुजरातीने आपला पाचवा डाव अनिर्णित राखला. या स्पर्धेतील अद्याप आठ फेऱ्या बाकी आहेत. विदीत गुजरातीने पाचव्या फेरीतील लढतीत नेदरलँड्सच्या वेर्डरमनला बरोबरीत रोखले. या दोन्ही खेळाडूंना प्रत्येकी अर्धा गुण मिळाला. सदर स्पर्धेच्या गुणतक्त्यात पाचव्या फेरीअखेर हॉलंडचा अनिश गिरी चार गुणासह पहिल्या स्थानावर असून भारताचा आर. प्रग्यानंद, फ्रान्सचा फिरोजा अलीरेझा आणि उझ्बेकचा नोडीरबेक हे प्रत्येकी समान 4 गुणासह दुसऱ्या स्थानावर आहे. गुजराती आणि गुकेश यांनी आतापर्यंत समान 2.5 गुण घेतले असून अन्य तीन स्पर्धंकासमवेत ते संयुक्त तिसऱ्या स्थानावर आहेत.
या स्पर्धेत शुक्रवारी एक धक्कादायक निकाल पाहावयास मिळाला. महिला विश्वविजेती चीनची जू वेनजुनने अलिरेझाचा पराभव करत पूर्ण गुण वसूल केला. ग्रँडमास्टर मेंडोनेकाने भारताच्या डी. हरिकाचा पराभव केला. या विजयामुळे मेंडोनेकाने पाच सामन्यातून तीन गुणासह वरचे स्थान मिळविले आहे. मात्र तुर्कीच्या मुस्तफाकडून भारताच्या दिव्या देशमुखला हार पत्करावी लागली. चौथ्या फेरीअखेर हॉलंडची इर्विन लामी 4 गुणासह पहिल्या स्थानावर आहे. युक्रेनचा कोरोबोव्ह 3.5 गुणासह दुसऱ्या स्थानावर आहे.









