भारत जोडो न्याय यात्रेचा सहावा दिवस : आसामच्या मुख्यमंत्र्यांवर टीका
वृत्तसंस्था/ माजुली
काँग्रेसच्या भारत जोडो न्याय यात्रेचा शुक्रवार हा सहावा दिवस होता. काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी शुक्रवारी यात्रेदरम्यान ब्रह्मपुत्रा नदीत नौकेतून प्रवास केला आहे. राहुल हे जगातील सर्वात मोठे नदी बेट माजुली येथे पोहोचले.
आसामचे मुख्यमंत्री बिथरले आहेत. भारत जोडो न्याय यात्रा कुणीच रोखू शकत नाही. आम्ही कुठल्याच नियमाचा भंग केलेला नाही. आसामचे मुख्यमंत्री हेमंत विश्व शर्मा हे लोकांनी रस्त्यावर येऊ नये आणि राहुल गांधींची भेट घेऊ नये यासाठी पूर्ण प्रयत्न करत आहेत. शर्मा यांनी शक्य आहे ते करावे, आम्ही आमच्या धोरणानुसार कृती करणार आहोत असे काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी म्हटले आहे. आसामच्या जोरहाटमध्ये यात्रेचा मार्ग बदलल्यावर भारत जोडो न्याय यात्रा आणि याचे मुख्य आयोजक के.बी. बायजू यांच्या विरोधात एफआयआर नोंदविण्यात आला आहे.
भारत जोडो न्याय यात्रा ही गुरुवारी नागालँडमधून आसाममध्ये दाखल झाली होती. येथील शिवसागर जिल्ह्यात राहुल यांनी एका सभेला संबोधित केले होते. भाजप आणि संघ देशात आर्थिक, सामाजिक आणि राजकीय अन्याय करत आहे. भारत जोडो न्याय यात्रेचे उद्दिष्ट प्रत्येक धर्म, प्रत्येक जातीच्या लोकांना एकजूट करण्यासोबत अन्यायाच्या विरोधात लढणे असल्याचा दावा राहुल गांधी यांनी केला होता.
आसाममध्ये देशातील सर्वात भ्रष्ट सरकार आहे. भाजप देशात द्वेष फैलावण्यासोबत जनतेचा पैसा लुटत आहे. आम्ही भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान आसामचा मुद्दा उपस्थित करणार आहोत असे राहुल यांनी म्हटले होते.
मणिपूरमध्ये गृहयुद्धासारखी स्थिती असूनही पंतप्रधान मोदी आजवर तेथे पोहोचले नाहीत. नागालँडच्या लोकांना पंतप्रधान मोदींनी मोठमोठी आश्वासने दील होती, या आश्वासनांचे काय झाले असे तेथील लोक आता विचारू लागले आहेत. असाच प्रकार आसाममध्ये देखील घडत असल्याचा आरोप राहुल यांनी केला होता.









