अर्ज करणाऱ्यांच्या संख्येत वाढ : पण, नवीन रेशनकार्ड वितरणास सरकारकडून अद्याप परवानगी नाही
बेळगाव : राज्य सरकारकडून रेशनकार्डधारकांसाठी अनेक योजना राबविल्या जात आहेत. त्यामुळे रेशनकार्ड मिळविण्यासाठी अनेकांची चढाओढ सुरू आहे. गृहलक्ष्मी योजना सुरू केल्यानंतर रेशनकार्डांसाठी अर्ज करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. असे असले तरी सरकारकडून रेशनकार्ड वितरणास स्थगिती देण्यात आली आहे. त्यामुळे रेशनकार्ड वितरण प्रक्रिया ठप्प झाली आहे. मात्र अत्यावश्यक असणाऱ्या वैद्यकीय उपचारांसाठी रेशनकार्ड उपलब्ध करून देण्यात येत आहे. महिन्याभरात 25 पेक्षा अधिक जणांना वैद्यकीय उपचारांसाठी रेशनकार्ड उपलब्ध करून देण्यात आले आहे. गृहलक्ष्मी योजनेतून प्रतिमहिना दोन हजारांची आर्थिक मदत, अन्नभाग्य योजनेतून बीपीएल रेशनकार्ड धारकांना दरडोई 5 किलो तांदूळ यासह तांदळाच्या बदल्यात राज्य सरकारकडून पैसे दिले जात आहेत. याबरोबर आरोग्य सुविधेसह इतर विविध सुविधा दिल्या जात आहेत. त्यामुळे रेशनकार्ड मिळविण्यासाठी प्रत्येकाची धडपड सुरू आहे. रेशनकार्ड मिळविण्यासाठी जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात ऑनलाईन अर्ज दाखल करण्यात आले आहेत. मात्र सरकारकडून रेशनकार्ड वितरण प्रक्रिया थांबविण्यात आली आहे. केवळ वैद्यकीय उपचारांसाठी तत्काळ रेशनकार्ड उपलब्ध करून दिले जात आहे.
तत्काळ रेशनकार्ड उपलब्ध करून देण्याची सोय
गंभीर स्वरुपाच्या आजारांवर जिल्हा रुग्णालयामध्ये बीपीएल रेशनकार्डाची मागणी केली जाते. यावेळी गोरगरीब रुग्णांना रेशनकार्डांअभावी उपचार घेणे अशक्य ठरत आहे. यासाठी अन्न व नागरी पुरवठा खात्याकडून तत्काळ रेशनकार्ड उपलब्ध करून देण्याची सोय करण्यात आली आहे. यासाठी डॉक्टरचे प्रमाणपत्र आवश्यक आहे. याची अन्न निरीक्षकांकडून पडताळणी केली जाते. यानंतर तहसीलदारांकडून अहवाल सादर करावा लागतो. या अहवालाच्या आधारावर अन्न व नागरी पुरवठा खात्याच्या संचालकांकडून सदर अहवाल अन्न व नागरी पुरवठा खात्याच्या आयुक्तांकडे सादर केला. त्यानंतरच वैद्यकीय उपचारासाठी रेशनकार्ड उपलब्ध करून दिले जाते. संबंधित व्यक्तीला संपर्क साधून याची माहिती दिली जात आहे. अशा प्रकारे वैद्यकीय उपचारांसाठी सोय करण्यात येत आहे, असे अन्न व नागरी पुरवठा खात्याच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.
महिन्याभरात 25 पेक्षा अधिक गरजूंना रेशनकार्ड उपलब्ध
सध्याच्या घडीला नवीन रेशनकार्ड वितरणास सरकारकडून परवानगी देण्यात आलेली नाही. मात्र वैद्यकीय उपचारांसाठी गोरगरीब नागरिकांना रेशनकार्ड उपलब्ध करून देण्यात येत आहे. यासाठी डॉक्टरांचे प्रमाणपत्र, तहसीलदारांचा अहवाल पाहून खात्याच्या आयुक्तांकडे प्रस्ताव पाठविले जात आहेत. गेल्या महिन्याभरात 25 पेक्षा अधिक गरजू नागरिकांना वैद्यकीय उपचारांसाठी रेशनकार्ड उपलब्ध करून देण्यात आले आहे.
– श्रीशैल कंकणवाडी, अन्न व नागरी पुरवठा खात्याचे उपसंचालक









