रोपे वाचविण्यासाठी टँकरद्वारे पाण्याचा पुरवठा : रोपांच्या सभोवती कुंपण घालण्याचे कामही जोमात सुरू
बेळगाव : यंदा पावसाअभावी सामाजिक वनीकरणामार्फत लावण्यात आलेल्या रोपांना धोका निर्माण झाला आहे. काही ठिकाणी रोपे सुकत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे सामाजिक वनीकरणामार्फत विविध ठिकाणी रोपांना टँकरव्दारे पाण्याचा पुरवठा केला जात आहे. यंदा सर्वत्र पाणी टंचाईचे संकट गडद होऊ लागले आहे. अशा परिस्थितीत रोपांना वाचविण्यासाठी सामाजिक वनीकरणाची धडपड सुरू आहे. सामाजिक वनीकरणामार्फत पावसाळ्यादरम्यान 30 ते 35 हजार रोपांची लागवड करण्यात आली आहे. रस्त्याच्या दुतर्फा, प्राथमिक आरोग्य केंद्र, सरकारी शाळा, खुल्या जागा, स्मशानभूमी आदी ठिकाणी ही लागवड झाली आहे. विशेषत: आंबा, चिक्कू, लिंबू, सागवान, चिंच, पिंपळ, वड आदी रोपांचा यामध्ये समावेश आहे. लावण्यात आलेल्या एकूण झाडांपैकी काही झाडे पाण्याविना सुकून गेली आहेत. तर सुस्थितीत असलेल्या रोपांना पाण्याबरोबर सभोवती कुंपण घालण्याचे कामही हाती घेण्यात आले आहे. जलाशय, नदी, नाले आणि तलावांच्या पाणी पातळीतही घट होऊ लागली आहे. त्यामुळे रोपांना पाणी देणे अधिक कठीण होत आहे. त्यामुळे सामाजिक वनीकरण विभागाला जादा पैसे देऊन टँकरने पाणी घ्यावे लागत आहे.
नरेगा योजनेंतर्गत कूपनलिकांची खोदाई
वनीकरण विभागाने नरेगा योजनेंतर्गत कूपनलिकांची खोदाई केली आहे. मात्र पाणीपातळी खाली गेल्याने पाणी मिळणे अशक्य होऊ लागले आहे. अशा परिस्थितीत टँकरने पाणी विकत घ्यावे लागत आहे. नरेगा योजनेंतर्गत विविध ठिकाणी खोदाई केली जात आहे. यामध्ये वनीकरणामार्फत रोपांची लागवड करण्यात आली आहे. मात्र सद्य परिस्थितीत पाण्याविना रोपटी सुकून जात असल्याचे दिसत आहे. अशा रोपांचे संवर्धन करण्यासाठी जलसिंचन केले जात आहे.
रोपांचे संवर्धन…
विविध ठिकाणी पावसाळ्या दरम्यान लावण्यात आलेल्या रोपांना टँकरव्दारे पाणी दिले जात आहे. रोपे सुकून जाणार नाहीत, याची काळजी घेतली जात आहे. रस्त्याच्या कडेला किंवा सरकारी जागेत लावलेल्या रोपांना पाणी सोडून संवर्धन केले जात आहे.
– गिरीश ईटगी, सामाजिक वनीकरण अधिकारी









