अन्यथा ग्रा. पं.ला टाळे ठोकण्याचा इशारा : यापूर्वीच्या पीडीओबद्दल ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी
वार्ताहर /उचगाव
सुळगा(हिं.) ग्रा. पं. मध्ये सध्या स्मिता चंदरगी या पी. डी. ओ म्हणून कार्यभाग सांभाळत असताना देखील पुन्हा या ठिकाणी वीणा हलवाई या रुजू झाल्या आहेत. हलवाई या यापूर्वी बारा वर्षे सुळगा ग्रा. पं.मध्ये कार्यरत होत्या. त्यांचा कार्यभाग चांगला नसल्याने ग्रा. पं. कार्यक्षेत्रातील नागरिक आणि ग्रामस्थ त्यांच्यावरती नाराज असल्याने त्यांना पी.डी.ओ. म्हणून नियुक्त करू नये, स्मिता चंदरगी अथवा नवीन पीडीओची नियुक्ती ग्रामपंचायतमध्ये करावी, यासंदर्भात ता. पं. एईओ यांना निवेदन देऊन सुळगा ग्रामपंचायतच्या वतीने मागणी करण्यात आली आहे.
सुळगा ग्रामपंचायत ही कल्लेहोळ आणि सुळगा या दोन गावांचा या कार्यक्षेत्रामध्ये समावेश आहे. या ग्रामपंचायतमध्ये यापूर्वी वीणा हलवाई यांनी गेली बारा वर्षे पीडिओ म्हणून कार्यभाग सांभाळला होता. मात्र या काळात गावाच्या विकासामध्ये, सुधारणांमध्ये काहीही विशेष बदल झाला नाही, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. तसेच त्यांच्या कार्याबद्दल ग्रामस्थांमध्ये व ग्रा. पं. सदस्यांमध्ये नाराजीचा सूर आहे. अनेक कामे योग्यप्रकारे हाताळली जात नाहीत. कामे केली जात नाहीत, अशा अनेक तक्रारी त्यांच्या बाबतीत असल्याने या तक्रारीचे निवेदन बुधवार दि. 17 जानेवारी रोजी ता. पं. एईओ यांना लेखी निवेदन देऊन मागणी करण्यात आलेली आहे.
वीणा हलवाई या राजकीय वजन वापरून या ग्रामपंचायतमध्ये पुन्हा पीडीओ म्हणून हजर होण्यासाठी खटाटोप चालवल्याची तक्रार ग्रा. पं. सदस्य आणि नागरिकांची आहे, असे निवेदनामध्ये नमूद करण्यात आले आहे. स्मिता चंदरगी यांचा कार्यभाग चांगला आहे. त्यांना तरी कायम करावे, अन्यथा दुसरा पीडीओ या ग्रामपंचायतमध्ये नियुक्त करावा आणि नागरिकांच्या अनेक विविध कामांना चालना मिळवून द्यावी. कार्यतत्पर, अनुभवी पीडिओंची तातडीने या ग्रामपंचायतमध्ये नियुक्ती करावी. अन्यथा ग्रामपंचायतला टाळे ठोकून निषेध व्यक्त करण्यात येईल, असा इशाराही सुळगा ग्रामस्थांनी दिला आहे. बुधवारी दिलेल्या निवेदनावेळी रमेश खन्नूकर, अनिल पाटील, महादेव कंग्राळकर, मोहन पाटील, सुरज पाटील, अजित किल्लेदार, यल्लाप्पा उचगावकर, दीपक, इराप्पा कोलकार यासह अनेक नागरिक, सदस्य यावेळी उपस्थित होते.









