खासदारांनी पत्रकारांनाही टाळले
खानापूर : खासदार अनंतकुमार हेगडे यांचा दौरा अखेर वाद्ग्रस्त ठरला असून कार्यकर्त्यांनी बैठकीतच प्रश्नांची सरबती सुरू केल्याने हेगडे यांनी कार्यकर्त्यांच्या प्रश्नांना बगल देत धार्मिकतेचे भाषण देवून पुन्हा मोदींसाठी लोकसभेला मतदान करावे, असे आवाहन करून बैठकीतून काढता पाय घेतला. तसेच पत्रकारांनाही टाळले. पत्रकारांपासून दूरच राहणे अनंतकुमार हेगडे यांनी पसंत केले आहे. या बैठकीत आमदार विठ्ठल हलगेकर, तालुका अध्यक्ष संजय कुबल, उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. लोकसभेच्या निवडणुकीचे वारे वाहू लागले असून खासदार अनंतकुमार हेगडे यांनी अलीकडे जाणीवपूर्वक स्टंटबाजी करून वाद्ग्रस्त वक्तव्य करण्यास सुरुवात केली आहे. आणि संपूर्ण मतदारसंघाचा दौराही त्यांनी सुरू केला आहे. त्याचाच एक भाग म्हणून त्यांनी बुधवारी खानापूर तालुक्याचा धावता दौरा केला. तसेच खानापूर पक्ष कार्यालयात कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करून आपण निवडणुकीसाठी इच्छूक असल्याचे दाखवून दिले आहे. खासदारांच्या दौऱ्यात पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यातील गटबाजी उघडपणे दिसून आली. कार्यकर्त्यांतून हेगडे यांच्या कार्यपद्धतीबाबत तीव्र नाराजी व्यक्त होत होती. जर पदाधिकारीच आळीमिळी गुपचिळी असतील तर आम्ही बैठकीत बोलून वाईट का व्हावे, अशीही नाराजीची प्रतिक्रिया अनेक वरिष्ठ कार्यकर्त्यांनी तसेच माजी पदाधिकाऱ्यांनी यावेळी व्यक्त केली. काही कार्यकर्त्यांनी मात्र बैठकीत खासदार हेगडे यांना जोरदार प्रश्नांची सरबती सुरू केल्याने त्यांना समर्पक उत्तरे देता आली नाहीत.
भाजपचे कार्यकर्ते वकील चेतन मणेरीकर यांनी तालुक्यातील कार्यकर्त्यांशी संपर्क का ठेवत नाही. आणि खानापूरसाठी कोणता उपक्रम राबवलेला आहे, असा प्रश्न उपस्थित केला. विनायक मुतगेकर यांनी तर गेल्या 25 वर्षाचा लेखाजोखा त्यांच्यासमोर मांडला. तसेच गेल्या पाच वर्षातील कार्यकाळात कोरोना, महापुराचे वेळी कुठे होता, असा खडा सवाल केला. तसेच खानापूर-रामनगर रस्ता आठ वर्षापासून रेंगाळत आहे. तुम्ही केंद्रात का आवाज उठवला नाही. यासह अनेक प्रश्नांची सरबती केल्याने खासदारांना काहीही उत्तर देता आले नाही.यावेळी भाजप कार्यकर्ते जयंत तिनेकर यांनी खासदार हेगडे यांना प्रश्न विचारत खानापूरकरानी पाच निवडणुकीत तुम्हाला भरघोस पाठिंबा दिलेला आहे. आता खानापूर तालुक्यातील भाजप कार्यकर्त्याला खासदारकीची उमेदवारी द्यावी आणि त्यांना निवडून आणण्यासाठी आपण प्रयत्न करावेत, असे आवाहन केले. यावेळी खासदार हेगडे यांनी, आपल्या पद्धतीप्रमाणे कार्यकर्त्यांना धार्मिक भाषण देऊन पुन्हा निवडणुकीसाठी इच्छुक असल्याचे स्पष्ट केले आहे. कार्यकर्त्यांनी आणि सामान्य जनतेतील तीव्र प्रतिक्रिया पाहता खासदार अनंतकुमार हेगडे यांच्याबाबत पुढील निवडणुकीत त्यांना खानापूर तालुक्यातून पाठिंबा मिळणे अवघड दिसत आहे. अनंतकुमार हेगडे यांच्या दौऱ्यावेळी जाणीवपूर्वक खानापुरातील भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी आणि खासदार हेगडे यांनी पत्रकारांना दूर ठेवून आपला हेतू साध्य केलेला आहे.









