फटाके कारखान्यात घडली दुर्घटना
वृत्तसंस्था/ बँकॉक
मध्य थायलंडमधील फटाक्मयांच्या कारखान्यात बुधवारी झालेल्या स्फोटात 23 जणांचा मृत्यू झाला. सुफान बुरी प्रांतातील स्थानिक बचाव कर्मचाऱ्यांनी या दुर्घटनेची काही छायाचित्रे पोस्ट केली असून त्यात कारखाना पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्याचे दिसून येत आहे. आपत्ती प्रतिबंध यंत्रणा आणि अग्निशमन विभागाने कर्मचारी घटनास्थळी बाधित लोकांना मदत करण्यात गुंतले आहेत. सदर स्फोटाचे कारण तपासले जात आहे. स्फोटाच्या वेळी कारखान्यात 20 ते 30 कामगार होते. त्यापैकी एकही कामगार जिवंत सापडला नसल्याचे प्राथमिक तपासाअंती सांगण्यात आले. कारखान्याबाहेरील परिसरात असलेल्यांपैकी एकाचा मृत्यू झाला असून तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. दुर्घटना घडलेले सुफान बुरी हे ठिकाण बँकॉकच्या वायव्येस 95 किलोमीटर अंतरावर आहे.









